हायलाइट्स:
- अमरावती जिल्ह्याला पावसाने झोडपले!
- अनेक तालुक्यांत पिकांचे नुकसान
- साऊर गावात ढगफुटी, रस्ते पाण्याखाली
अमरावती: जिल्ह्यात मागच्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अमरावती परतवाडा मार्गावरील साऊर गावात ढगफुटीमुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास निसर्गाचे हे रौद्ररूप पाहायला मिळाले.
आठवडाभरापासून पाऊस सुरूच होता. मात्र, दुपारच्या अचानक इतका पाउस झाला काही क्षणातच साऊर गावातील रस्ते व शेती पाण्याखाली गेली. त्यामुळं गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली. अमरावती चांदुरबाजार रोडवरील पुसदा येथे पुलावरून पाणी वाहू लागल्यानं या रस्त्यावर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. तर, शिराळा शिवारात शेतात पाणी साचल्यानं पिके पाण्याखाली गेली. दर्यापूर तालुक्यात थिलोरी येथे पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यानं थिलोरी गावात पाणी शिरलं.
वाचा: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात दरड कोसळली
दुसरीकडे भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथे काका-पुतण्या वाहून गेले. दर्यापूर रस्त्यावरील पुलावरील वाहत्या पाण्यात पाय घसरून ते पडले व पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. प्रवीण गुडघे व अनिल गुडघे अशी त्यांची नावं आहेत. भातकुलीच्या तहसीलदार नीता लबडे यांना ही महिती मिळताच तात्काळ त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण केलं. रेस्क्यू टीमनं शोधमोहीम सुरू केली. मात्र, अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही. त्यांचा शोध सुरूच आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
वाचा:महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे; मुख्यमंत्र्यांचे विठुराया चरणी साकडे