मंगळवारी पनवेल महापालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी महापालिका क्षेत्रातील ई-टॉयलेटबाबत प्रश्न उपस्थित करून नाराजी व्यक्त केली. उपमहापौरांनीही महापालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले, पालिका कोट्यवधी रुपये खर्चूनही शहरात पाणी साचणार असेल तर ही महापालिका कंत्राटदारांना पोसण्यासाठी आहे का, असा सवाल त्यांनी केला.
केवळ मान्सूनपूर्व कामे नव्हे तर महापालिकेने केलेल्या विविध कामांची यादी वाचून दाखवत त्यांनी सर्व कामांची चौकशी आयआयटीकडून करण्याची मागणी केली. मला या पदावर बसायचे नसून मी राजीनामा देईन, असा इशारादेखील त्यांनी दिला. विरोधी पक्षाच्या नगरसेवक सतीश पाटील यांनी नगरसेवकांचे प्रश्न सोडविणाऱ्यांवर ही वेळ आल्याचा चिमटा काढला. उपजिल्हा रुग्णालय येथील विलगीकरण कक्ष, इंडिया बुल्स येथील विलगीकरण केंद्र आणि जम्बो कोविड सेंटर येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना अल्पोपहार पुरविण्याच्या विषयाला महासभेने मान्यता दिली. घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया करणेकामी सरकारकडून खानाव येथील गट क्र. ८३ अ ही जागा मिळण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यास मंजुरी दिली.