हायलाइट्स:
- करोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधी राजेश टोपे यांचं महत्त्वाचं विधान
- लसीचे दोन डोस घेतलेल्यांना सूट देण्याबाबत एकमत
- मुख्यमंत्री व कोविड टास्क फोर्स लवकरच अंतिम निर्णय घेणार – टोपे
मुंबई: करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची संभाव्य चर्चा सुरू आहे. त्यामुळं अनेक गोष्टींवरचे निर्बंध ‘जैसे थे’ असून लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. धोका नसेल तर निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तिसऱ्या लाटेसंबंधी महत्त्वाचं विधान केलं आहे. (Rajesh Tope On Third Wave of Coronavirus)
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जुलै ते सप्टेंबर दरम्यान करोनाची तिसरी लाट येणार, असे अंदाज वर्तवले जात होते. त्या विषयी राजेश टोपे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, ‘करोनाची तिसरी लाट नेमकी कधी येणार की येणारच नाही, याचं उत्तर आपल्यावर अवलंबून आहे, असं टोपे यांनी सांगितलं. ‘प्रशासनानं कोविडच्या बाबतीत घालून दिलेले नियम व निर्बंध जनतेनं पाळले. कोविडपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली तर ही लाट थोपवता येऊ शकते,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वाचा:लसीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधांतून सूट? अजित पवारांचे संकेत
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी व त्यांच्यावरील अन्य निर्बंध उठवावेत, अशी एक मागणी होत आहे. त्याबाबत विचारलं असता, राज्य सरकारच्या पातळीवरही याबाबत चर्चा सुरू असल्याचं टोपे म्हणाले. जसजसं लसीकरण होत आहे, तसतसे निर्बंध शिथील करण्याची राज्य सरकारची भूमिका आहेच. अजिबात निर्बंध उठत नाहीत असं नाही. पूर्वी विमानानं मुंबईत येणाऱ्या प्रवाशाचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह नसेल तर त्यांना प्रवेश मिळायचा नाही. अशा प्रवाशांना थेट विलगीकरण केलं जायचं. आता तसं होत नाही. लसीचे दोन डोस घेतले असतील तर त्याला प्रवेश दिला जातो. टप्प्याटप्प्यानं हे होत आहे. लोकलच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता प्रत्येक प्रवाशाला थांबवून त्यांच्याकडील लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी करता येईल का? रेल्वेकडं तितकं मनुष्यबळ आहे का? हे प्रश्न आहेत. त्यामुळं अद्याप काही निर्णय झालेले नाहीत. मात्र, दोन लस झालेल्यांवरील काही निर्बंध शिथील करायला हवेत, याबाबत कुणाचंही दुमत नाही. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कोविड टास्क फोर्स लवकरच या संदर्भात निर्णय घेतील, असं टोपे यांनी सांगितलं.
वाचा: ‘त्या लोकांनी मोदी सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे’