दरोडे व बळजबरीने चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात 

कर्जत,दि.१९ :- ७५ वर्षाची वृद्ध महिला घराबाहेर झोपली असताना रात्री घरात प्रवेश करत घराबाहेर येताना महिलेचा गळा दाबून, मारहाण करून कानातील व गळ्यातील दागिने बळजबरीने चोरून नेलेल्या चोरट्याला अखेर कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे.त्याने राशीन मध्ये घरातून चोरी केल्याचीही कबुली दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी,तालुक्यातील कोळवडी (खानवटेवस्ती) येथे दि.२५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेला मारहाण करत बळजबरीने महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी केली होती. याबाबत ठकूबाई लाला खानवटे (वय ७५ वर्षे) यांनी फिर्याद दिली होती. या फिर्यादीत असे म्हटले आहे की, फिर्यादी आपल्या कुटुंबासोबत राहत असून फिर्यादीचा मुलगा बबन खानवटे याने नवीन घर बांधल्याने व घराची अध्याप वास्तुशांती न झाल्याने फक्त फिर्यादी नव्या घरात झोपण्यासाठी जात होत्या.दि.२५ ऑगस्ट रोजी फिर्यादी घराच्या पोर्चमध्ये झोपल्या असताना मध्यरात्री बाथरूमसाठी उठल्या असता उशाला ठेवलेली बॅटरी मिळून आली नाही. त्यावेळी घरातून दोन इसम बाहेर आले आणि फिर्यादीचा गळा दाबून चापटीने मारहाण केली.’आरडाओरडा करू नको नाहीतर ठार मारीन’ अशी धमकी देत गळ्यातील सोन्याच्या मण्याची माळ,कानातील सोन्याची फुले असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल बळजबरीने ओढून नेला.
त्यानंतर दि.४ सप्टेंबर रोजी गौतम अनिल डोंडे (मूळ रा.भालु खोंदरा ता.लोरमी जि.मुगेली छत्तीसगड) सध्या कानगुडवाडी (ता.कर्जत) हे मजुरीचे काम करतात. ते बांधकाम व्यावसायिक बिभीषण काळे (रा.परीटवाडी) यांच्याकडे गेली सहा महिन्यापासून कामाला आहेत.कानगुडवाडी शिवारात बंगल्याचे काम सुरू असल्याने फिर्यादी व इतर लोकांना राहण्यासाठी त्या ठिकाणी पत्र्याचे घर तयार करण्यात आले आहे. दि.४ रोजी काम करून आल्यानंतर रात्री १० वाजता आतून कडी लावून सर्वजण झोपी गेले होते. पहाटे १ वाजता दरवाजा उघडा असल्याचे दिसले. उशाजवळ ठेवलेला स्वतः चा व इतरांचे असे ३ मोबाईल व साहित्य ही गायब असल्याचे समजल्याने फिर्यादीने जोडीदारांना विचारले मात्र मोबाईल आढळून आला नाही. १७९९० रु. किमतीचे मोबाईल चोरी गेल्याची खात्री झाल्यावर फिर्यादीने फिर्याद दिली.
कर्जत पोलिसांनी सदरचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने सतत पाठपुरावा ठेवून गोपनीय माहिती काढून पोखरणा अभिमान काळे, वय २४ वर्षे, राशीन, तालुका कर्जत यास ताब्यात घेतले व सखोल विचारपूस केली असता आता या दोन्ही घटनेतील मुद्देमाल त्याचे साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली पोखरणा अभिमान काळे (रा.राशीन) या अट्टल गुन्हेगाराने दिली असुन राशीन येथेही त्याने घरफोड्या केल्या असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. सदर आरोपीवर जबरी चोरी घरफोडी चोरी तसेच मारहाण करणे असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे पोलीस जवान श्याम जाधव पांडुरंग भांडवलकर गोवर्धन कदम भाऊ काळे अर्जुन पोकळे संपत शिंदे यांनी केली आहे.

Comments (0)
Add Comment