हायलाइट्स:
- अतिवृष्टीमुळे अमरावतीत अनेक गावांचा संपर्क तुटला
- ढगफुटीमुळं शेतीचं नुकसान
- आठवड्याभराच्या पावसाने गावांत शिरलं पाणी
अमरावती : अमरावती जिल्ह्यात मागील 48 तासापासून सरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या या जोडीने शेतातील कामंसुद्धा थांबली आहेत. दऱ्याखोऱ्यांनी समृद्ध असलेल्या मेळघाटातील लहान मोठ्या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. मेळघाटातील अनेक पूल हे ब्रिटिश कालीनअसून कमी उंचीचे असल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे जिल्हा मुख्यालयापासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
ज्या पुलावरून दोन चाकी किंवा चारचाकीने पूल ओलांडणे शक्य नाही अशा ठिकाणी नागरिक शेतात व इतर कामा करिता जाण्यासाठी थेट ट्रॅक्टर व ट्रॉलीचा वापर करत आहेत अशा प्रकारे होणारी वाहतूक ही धोकादायक असून पाऊस असताना फुल ओलांडून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. खरंतर, जिल्ह्यात मागच्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अमरावती परतवाडा मार्गावरील साऊर गावात ढगफुटीमुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास निसर्गाचे हे रौद्ररूप पाहायला मिळाले.
आठवडाभरापासून पाऊस सुरूच होता. मात्र, दुपारच्या अचानक इतका पाउस झाला काही क्षणातच साऊर गावातील रस्ते व शेती पाण्याखाली गेली. त्यामुळं गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली. अमरावती चांदुरबाजार रोडवरील पुसदा येथे पुलावरून पाणी वाहू लागल्यानं या रस्त्यावर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. तर, शिराळा शिवारात शेतात पाणी साचल्यानं पिके पाण्याखाली गेली. दर्यापूर तालुक्यात थिलोरी येथे पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यानं थिलोरी गावात पाणी शिरलं.
दुसरीकडे भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथे काका-पुतण्या वाहून गेले. दर्यापूर रस्त्यावरील पुलावरील वाहत्या पाण्यात पाय घसरून ते पडले व पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. प्रवीण गुडघे व अनिल गुडघे अशी त्यांची नावं आहेत. भातकुलीच्या तहसीलदार नीता लबडे यांना ही महिती मिळताच तात्काळ त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण केलं. रेस्क्यू टीमनं शोधमोहीम सुरू केली. मात्र, अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही. त्यांचा शोध सुरूच आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.