हायलाइट्स:
- हवामान विभागाने वर्तवली शक्यता
- रायगड, रत्नागिरी, पुण्यासाठी रेड अॅलर्ट
- चिपळूण, खेडमध्ये पूरस्थिती
रत्नागिरीः राज्यातील बहुतांश भागात पावसानं रौद्ररुप धारण केलं आहे. कोकणातील चिपळूण, खेड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आणखी दोन ते तीन दिवस कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, २६ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे.
हायटाइड व अतिवृष्टी एकत्र आल्यामुळं खेड व चिपळूणमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून सध्या ती ९ मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून ती ७.८ मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या १.७४ मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत.यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे. पुढील तीन दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
PHOTOS: राज्यात पावसाचा कहर; अनेक गावांचा संपर्क तुटला
कोकणात २ ते ३ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागानं आज रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
चिपळूणला महापुराचा वेढा; हजारो नागरिक पाण्यात अडकले, बचावकार्य सुरू
सध्या दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचसोबत पूर्व-पश्चिम वाऱ्यांच्या स्थितीमुळे मान्सूनला चालना मिळत असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी स्पष्ट केले. पुढील पाच दिवसांसाठी मच्छिमारांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. २५ जुलैपर्यंत त्यांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना हवामान विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
कोल्हापूरला पुराचा धोका; NDRF च्या दोन तुकड्या शहरात दाखल