हायलाइट्स:
- पारनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत १५८ नवे करोना बाधित रुग्ण.
- नऊ गावांतील सर्व व्यवहार पुढील सात दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा तहसीलदाराचा आदेश.
- लग्न, वाढदिवस, साखरपुडा अशा कार्यक्रमांतून संसर्ग वाढत आहे.
म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर
पारनेर तालुक्यातील करोनाचा कहर सुरूच असून गेल्या २४ तासांत १५८ नवे करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता नऊ गावांतील सर्व व्यवहार पुढील सात दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला. लग्न, वाढदिवस, साखरपुडा अशा कार्यक्रमांतून संसर्ग वाढत आहे. समारंभाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये किमान पाच व्यक्ती करोना बाधित आढळून येत असल्याचेही देवरे यांनी सांगितले. (in parner taluka of ahmednagar 158 new corona infected patients have been diagnosed in the last 24 hours)
आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या उत्तम व्यवस्थापनासाठी पारनेर तालुक्याची मोठी चर्चा झाली होती. या कामाचे कौतूक झाले, सन्मान आणि पुरस्कारही मिळाले. मात्र, आता पारनेर तालुका गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठरला आहे. आजही या तालुक्यात सर्वाधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. कळस आणि किन्ही गावात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोविड केअर सेंटर असलेल्या भाळवणीतही नवे रुग्ण आढळून येत आहेत. याचे कारण सांगताना देवरे यांनी म्हटले आहे की, १८ जुलैला तालुक्यात बऱ्याच ठिकाणी लग्न समारंभ होते. याशिवाय साखरपुडा आणि वाढदिवसाचे कार्यक्रमही होत आहेत. परवानगी घेऊन करण्यात येणाऱ्या लग्न समारंभावर प्रशासनाचे लक्ष आहे. तेथे चित्रिकरण करतानात वऱ्हाडींच्या चाचण्याही घेण्यात आल्या. प्रत्येक लग्नाच्या ठिकाणी किमान पाच तरी बाधित आढळून आले आहेत. त्यामुळेच तालुक्याचे आकडे वाढत आहेत. ग्रामस्थांनी अशा कार्यक्रमांना गर्दी न करता घरातूनच आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
क्लिक करा आणि वाचा- सांगलीत पुन्हा पुराची भीती; कृष्णेची पाणी पातळी पोहोचली २३ फुटांवर
बाधितांची संख्या वाढलेल्या नऊ गावांत आजपासून कडक नियम लागू करण्यात आले आहेत. तेथे पुढील सात दिवस कटेंन्मेट झोनचे सर्व नियम लागू राहतील. केवळ औषधे आणि कृषी सेवा केंद्र सुरू राहतील. बाकी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. याशिवाय गावात बाहेरच्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. गावातील शंभर टक्के ग्रामस्थांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. बाधित आढळून येणाऱ्यांना कोविड केअर सेंटरला पाठविण्यात येणार आहे, असेही देवरे यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- आस्मानी संकट! राज्यात पावसाचा कहर; अनेक गावांचा संपर्क तुटला
यापूर्वीही दोन टप्प्यात मिळून अनेक गावांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. तालुक्यात विवाहांसोबतच अन्य राजकीय कार्यक्रम, उपक्रमही सुरूच आहेत. भाळवणी येथील कोविड सेंटरमध्येही आषाढी एकादशीला रुग्णांची दिंडी काढण्यात आली होती. याशिवाय तालुक्यातही विविध नेत्यांच्या भेटी आणि कार्यक्रम सुरूच आहेत. पारनेर तालुक्यात सध्या ५२५ उपचाराधीन रुग्ण आहेत. जिल्ह्यात हा आकडा सर्वाधिक आहे.
क्लिक करा आणि वाचा- चिपळूण, खेडमध्ये पुराचे थैमान; दोन महिला वाहून गेल्या, तर हजारो घरे पाण्याखाली
जिल्ह्यातही रुग्णवाढ
अहमदनगर जिल्ह्यातही रुग्णवाढ झाल्याचे आढळून येत आहे. गेल्या २४ तासांत ४५४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या ७८९ रुग्णांची भर पडली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५७ टक्क्यांवर आले आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून ३,८९१ वर गेली आहे. १८ जणांचा मृत्यू झाला आहे.