‘महामहीम राज्यपाल साहेब, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आजच्या युगातला माणूस कितीही महान असला तरी होऊ शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, महाराज ही व्यक्ती नाही आमचा देव आहे, आमची श्रद्धा आहे. महाराजांच्या जागेवर कोणाचीही तुलना करणं महाराष्ट्राला सहन होणार नाही,’ अशा शब्दांत निलेश राणे यांनी ट्विटरवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सूचक इशारा दिला आहे.
दरम्यान, छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांसह मनसेनंही राज्यपालांचा आक्रमक शब्दांत समाचार घेत माफी मागण्याची मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?
‘महाराष्ट्रीय माणसांना विचारले की, तुमचा आदर्श कोण आहे, आजच्या युगात बोलायचे झाले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते डॉ. नितीन गडकरी यांच्यापर्यंतची नावे समोर येतील. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील नायक आहेत’, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. कोश्यारी यांनी याआधीही इतिहासातील महापुरुषांविषयी केलेली वक्तव्ये वादात सापडली आहेत. त्यांच्या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. समारंभात विद्यापीठातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी. लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर नालंदा विद्यापीठचे कुलपती डॉ. विजय भटकर, दीक्षांत पाहुणे म्हणून उपस्थित होते.