कर्नाक पुलाचे पाडकाम शनिवारी रात्री ११ वाजता सुरू झाले. त्यामुळे सीएसएमटी ते भायखळा धीम्या, जलद आणि सीएसएमटी ते वडाळारोड हार्बर लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. सरकारी आणि खासगी कार्यालये वगळता अन्य सीएसएमटी परिसरातील सर्व दैनंदिन व्यवहार सुरू राहणार आहेत. यामुळे आज, रविवारी प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेने पुढाकार घेतला आहे.
एसी लोकलसाठी रविवार वेळापत्रक
पश्चिम रेल्वेवर दर रविवारी नियोजित रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी घेतला जाणारा जम्बो ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर रविवारी पूर्ण क्षमतेने अर्थात सोमवार वेळापत्रकानुसार लोकल फेऱ्या धावणार आहेत. दरम्यान वातानुकूलित लोकल फेऱ्या रविवार वेळापत्रकानुसार धावणार आहेत, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
नोकरदारांची घाई
सीएसएमटी, नरिमन पॉइंट, फोर्ट या परिसरात अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांची मुख्यालये आहेत. मंत्रालयदेखील याच ठिकाणी आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत या परिसरात मोठी वर्दळ असते. भायखळा-मशीद परिसरात बाजारपेठा शनिवारी सुरू असतात. ब्लॉकमुळे शनिवारी शेवटची मुख्य आणि हार्बर मार्गावरील लोकलची वेळ साडेदहा वाजण्याच्या सुमारास होती. शेवटच्या लोकलची गर्दी टाळण्यासाठी अनेकांनी लवकर कामे आटोपली आणि आधीची लोकल पकडली.
व्यापाऱ्यांचा श्रमिकांना दिलासा
काळबादेवी, भुलेश्वर, झव्हेरी बाजार, नळ बाजार, मंगलदास मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, मनीष मार्केट या परिसरात अनेक दुकानांमधील श्रमिक वर्ग बदलापूर, टिटवाळा, कल्याण येथून येतो. लोकलच बंद होणार असल्याने या व्यापाऱ्यांनीदेखील श्रमिकांना वेळेच्या आधी कामावरून सुट्टी दिली. तरीदेखील दादर, भायखळा आणि सीएसएमटी स्थानकात दुपारी पाच वाजल्यापासून शेवटच्या लोकलपर्यंत गर्दी पाहायला मिळाली.
तरुणाईची तारांबळ
सीएसएमटी-चर्चगेट दरम्यान असलेल्या ‘फॅशन स्ट्रीट’वर शनिवार-रविवार हा खरेदीवार असतो. रविवारी दिवसभर लोकल बंद राहणार असल्याने अनेक तरुणांनी शनिवारीच खरेदीसाठी ‘एफएस’ गाठले. शनिवार दिवसभर खरेदी आणि संध्याकाळी मरीन लाइन्सच्या समुद्रावर फेरफटका मारून रात्र जागवणाऱ्या तरुणांना शनिवारी लवकर घर गाठावे लागले. या तरुण खरेदीदारांची शनिवारी मोठी तारांबळ उडाल्याचे दिसून आले.