Maharashtra Politics | सुधांशू त्रिवेदी यांच्यासाठीही देवेंद्र फडणवीस यांनी युक्तिवाद केला. या देशात आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा कुठलाही आदर्श असूच शकत नाही. सुधांशू त्रिवेदी यांचं वक्तव्य मी नीट ऐकलं आहे. त्यामध्ये त्रिवेदी यांनी कुठेही,’शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली’, असा उल्लेख केलेला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले
हायलाइट्स:
- कोश्यारींच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला
- कोश्यारी यांच्या अंगात विकृती असावी
भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य करण्यापूर्वी शिवरायांचा इतिहास वाचायला हवा होता. कोश्यारींनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वी अनेकदा शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. यासंदर्भात भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र देणार आहे, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांविषयी अशी वक्तव्यं करणाऱ्या या लोकांची एकतर बुद्धी भ्रष्ट झाली आहे किंवा त्यांच्या अंगात विकृती असावी. यामुळे त्यांचा कदाचित अंतही होऊ शकतो. त्यांच्या वक्तव्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. राज्यपाल हे मोठं पद आहे. भगतसिंह कोश्यारी यांना झेपत नसेल तर या पदावरून बाजूला व्हावे, अशी खरमरीत टीका उदयनराजे भोसले यांनी केली. त्यामुळे आता हा वाद आणखी किती चिघळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांनीही या मुद्द्यावरुन राज्यपाल कोश्यारी यांना फटकारले. राज्यपाल असं का बडबडतात, मला समजत नाही. याआधीही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन हटवावं अशी मागणी मी पंतप्रधान मोदींकडे केली होती. आताही मी तीच मागणी करतोय. खरंच अशी व्यक्तीच आम्हाला महाराष्ट्रात नको. या महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज असंख्य जणांचे प्रेरणास्त्रोत आहेत. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. घाणेरडे शब्द आणि इतके घाणेरडे विचार राज्यपालांच्या मनामध्ये येऊच कसे शकतात? यांना राज्यपाल म्हणून ठेवलंत तरी कसं? अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीसांकडून राज्यपालांचा बचाव
या जगात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशातील सगळ्याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. आजच्या भाषेत बोलायचे तर आमचे आजचे हिरो हे शिवाजी महाराज हेच आहेत. कोणाच्याही मनात याबाबत शंका नाही. मला वाटत नाही की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मनातही याबाबत काही शंका असेल. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. पण त्यांचा मनात तसा कुठलाही भाव नव्हता, असे सांगत फडणवीस यांनी राज्यपालांची बाजू लावून धरली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.