धुळे तालुक्यातील चिंचखेडे येथे राहणारे मनोज गायकवाड हे २१ वर्षांपूर्वी सैन्य दलात दाखल झाले होते. ते सध्या नाईक पदावर जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत होते. मात्र या भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे. त्यामुळे वातावरण खराब झाले. अशा वातावरणात कर्तव्य बजावत असताना अचानक हिमस्खलन झाले होते. यात जवान मनोज गायकवाड हे बर्फाच्या मोठ्या खड्याखाली दाबले गेले. त्यांना उपचारासाठी तात्काळ दिल्लीच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचाराच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आज त्यांचे पार्थिव चिंचखेडे गावात आणण्यात आले. यावेळी गावात सर्व रस्त्यांवर रांगोळी टाकून शहीद जवान अमर रहे असा संदेश लिहिण्यात आला, तर तरुणांनी गावात तिरंगा रॅली काढली. देशभक्तीपर घोषणा देत शहीद जवान मनोज गायकवाड यांची अंत्ययात्रा निघाली. यानंतर त्यांचा मुलगा अथर्व याने आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील, धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, यावेळी बोलताना खासदार सुभाष भामरे यांनी शहीद जवानाच्या नातेवाईकांना केंद्राकडून १ कोटी रुपयांची मदत मिळणार असून राज्य सरकारकडून देखील तेवढीच मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसंच शहीद जवानाच्या परिवारातील एका सदस्यास नोकरीत सामावून घेतले जाणार असून त्यांचा मुलगा आणि मुलगी यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.