राज ठाकरे काय म्हणाले?
आम्ही ज्या क्षेत्रात आहोत, तिथे कोणाचा थांग लागत नाही, आणि डायरेक्ट अथांगलाच आलो मी, असं म्हणत राज ठाकरे यांनी हलक्या फुलक्या वातावरणात संवादाला सुरुवात केली. मराठी घरात ओटी भरायची पद्धत आहे, ओटीटी भरायची नाही, त्यामुळे अक्षय बर्दापूरकर यांनी पहिला वहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’ सुरु करण्याच्या प्रयत्नाचं कौतुक असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
ओटीटी सेन्सॉरशीपविषयी प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी एका वेब सीरीजचं उदाहरण दिलं. त्यात फक्त व्याकरणापुरती भाषा होती, बाकी शिव्याच होत्या. आपल्याकडे लोकशाही अजून रुजतेय, त्यामुळे गरज असल्यास आवश्यक ते दाखवावं, कोणतीही बंधनं असू नयेत, आलेयत का कोणावर? आली असल्यास कळवा, असं राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले. त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.
हेही वाचा : मुंबई महापालिकेसाठी शिंदे-फडणवीसांची मोठी खेळी, सेनेला धक्का देण्यासाठी आखली रणनीती
मी राजकारणात अपघाताने आलो, पहिलं पॅशन फिल्म मेकिंगच आहे. पण निवडणुका हा एक धंदा, त्या संपतच नाहीत. एकामागून एक सुरु असतात. त्यामुळे इच्छा असूनही इतर विषयांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. माझ्या डोक्यात एक विचार सुरु आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांवर इतक्यात एवढे चित्रपट येऊन गेलेत की माझी हिंमत होत नाही त्याला हात लावायची. कॉलेजमध्ये मी जेव्हा गांधी चित्रपट पाहायचो, तेव्हा वाटायचं की महाराजांवर इतका मोठा सिनेमा यायला हवा, माझं त्याच्यावर काम सुरु आहे, तीन भागात सिनेमा येईल, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.
भारतात कोणावर बायोपिक बनताना पाहायला आवडेल, तर त्या म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. तो काळ रोलर कोस्टर होता, इंटरेस्टिंग होता, त्यामुळे त्यांच्यावरील चरित्रपट पाहायला आवडेल, असं राज म्हणाले. दरम्यान, मराठी सीरीजमध्ये हिंदीत बोलणार असतील, तर काय अर्थ आहे? असा सवालही राज यांनी विचारला. आपल्याकडे कलाकार कमी आहेत का? अमराठी माणसांना मराठी विनोदही कळतात, त्यांना मराठी येतं, आपल्याला असं वाटतं की त्यांना समजत नाही, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं.
हेही वाचा : ‘माझे दोन बारके बारके भाचे…’; नारायण राणेंच्या होमपीचवर सुषमा अंधारेंची फटकेबाजी