हायलाइट्स:
- पावसाची भीषणता दाखवणारा VIDEO
- पुराच्या पाण्यात सहज वाहून गेला पूल
- दोन दिवस पुलावरून पाच ते सहा फूट पाणी वाहत होते
रत्नागिरी : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने राज्यात पुरपरिस्थिती ओढावली आहे. अनेक जिल्ह्यांना मोठा पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरीमध्ये पावसामुळे पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. याचाच एक भीषणता दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे पादचारी पूल पाण्यात वाहून गेला आहे.
रत्नागिरीच्या कासारकोळवन नदीवरील जुना पूल पाण्यात सहज वाहून गेला. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मुसळधार पावसाने सर्व नद्यांना पूर आला असून कशाप्रकारे पाण्याच्या प्रवाहात पूल वाहून गेला. कोकणावर निसर्गाचे सतत संकट कोसळले आहे. यावेळी अतिवृष्टीमुळे संकट निर्माण झाले आहे. चिपळुणची परिस्थिती भयानक असून येथील पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एअरलिफ्टींग करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज पहाटे हा प्रकार घडला असून पुलाच्या मधोमध असलेला काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाली आहे. याठिकाणी उपस्थित असलेल्यांच्या म्हणण्याप्रमाणे गेले दोन दिवस या पुलावरून पाच ते सहा फूट पाणी सतत वेगाने वाहत होते. हा पूल जुन्या काळातील ब्रिटिशकालीन होता. नवीन पुलाचे काम सुरू असल्यामुळे या पुलावरूनच सध्या मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू होती.
आज पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीच्या पाण्याचा जोरही कमी झाला परंतु आज पहाटेच्या सुमाराला या पुलाचा काही भाग वाहून गेला. त्यामुळे पुलाचा भगदाड पडल्यासारखे दृश्य आहे मुंबई गोवा महामार्गावरील हा पूल महत्त्वाचा पूल असल्याने या पुलाच्या दुरूस्तीला आता किती काळ लागेल हे सांगता येत नाही त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता पुन्हा ठप्प होणार आहे.
बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरश: धुडगूस घातला. सह्याद्रीच्या पट्ट्यात धो-धो कोसळल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तर अनेक नद्यांना पूर आले. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी प्रलयाचे चित्र पहायला मिळत होते. गुरुवारी रत्नागिरीचे पालकमंत्री ऍड. अनिल परब जिल्हा दौर्यावर आले होाते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोळकेवाडी येथून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणाचे तीन दरवाजे उघडल्याने कोळकेवाडीतून चिपळूण शहरात पाण्याचा विसर्ग अतिवेगाने होऊ लागला. सध्या चिपळुणातील वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी दिली.