‘सध्या महाराष्ट्रामध्ये घाणेरडं राजकारण’
सध्या आमदार एकमेकांना मारण्याची भाषा वापरत आहेत. लोकप्रतिनीधी खालच्या पातळीवर टीका करतायत. राज्यातील या सध्याच्या राजकारणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र एक संस्कृतीप्रधान असे राज्य आहे. साधूसंतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र. या भूमीने विचार दिलेला आहे, संस्कार दिलेला आहे. या भूमीने केवळ महाराष्ट्रालाच नाही, तर या देशातल्या अनेक ठिकाणी आमच्या संतांचं संतसाहित्य पोहचून हा देश सुजाण आणि सुबुद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे विनायक राऊत म्हणाले.
आज या महाराष्ट्रामध्ये घाणेरड्या राजकारणामुळे आणि खऱ्या अर्थाने पैशाने राजकारणही विकत घेतले जात आहे. हा धंदा ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाने सुरू केला, त्यानंतर महाराष्ट्रातले वैचारिक पातळी घसरलेली आहे आणि भाऊबंधकी सुद्धा नष्ट झालेली आहे. एकमेकांवरचं प्रेम सुद्धा शत्रू समान झालेलं आहे. त्यामुळे हे आज महाराष्ट्रच दुर्दैव आहे. सध्या पैशाची सुद्धा मस्ती आहे, पैशाच्या आणि सत्तेच्या मस्तीमध्ये काल-परवापर्यंत आपल्या सहकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न हे बेमान आणि गद्दार लोक करत असल्याचे मत खासदार विनायक राऊतांनी व्यक्त केलं.
उद्धव ठाकरे आता अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबतही युती करु शकतात, या बावनकुळे यांच्या व्यक्तव्यावर राऊत म्हणालेत की, कदाचित बावनकुळेंची स्मरणशक्ती वयोमानाप्रमाणे कमी झाली असणार. ज्या पक्षाच्या आसऱ्याने काश्मिरी पंडितांची हत्या झाली, काश्मिरी पंडितांची घरे उध्वस्त झाली, बेचिराख झाली त्या पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्या पक्षाला भारतीय जनता पक्षाने मिठी मारलेली आपण पाहिले आहे. राजकारणातील मिठी मारत असताना भारतीय जनता पक्षाचे तसेच बावनकुळे यांचे हिंदुत्व कुठे गेले होते. त्यामुळे आम्हाला त्याने शहाणपणा शिकवण्यापेक्षा, आम्हाला मार्गदर्शन करण्यापेक्षा तुमच्या बुडाखाली काय जळते ते बघा की, असे राऊत म्हणाले.