‘मध्यस्थी’च्या माध्यमातून एवढ्या मोठ्या रकमेची भरपाई देत निकाली निघालेले हे राज्यातील पहिलेच प्रकरण ठरले आहे. पक्षकारांना जलद न्याय देण्याच्या दृष्टीने ‘मध्यस्थी’ अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी माध्यम ठरत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.
पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश व मोटार अपघात न्यायाधिकरणाचे अध्यक्ष एस. सी. चांडक आणि न्यायाधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश बी. पी. क्षीरसाग यांच्या उपस्थितीत विमा कंपनीने भरपाईच्या रकमेचा धनादेश खुर्जेकर यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.
‘एक्स्प्रेस वे’वर १५ सप्टेंबर २०१९ रोजी हा भीषण अपघात झाला होता. डॉ. केतन खुर्जेकर दोन सहकारी डॉक्टरांसोबत एका वैद्यकीय परिषदेसाठी मुंबईला गेले होते. परिषद आटोपल्यानंतर ते पुण्याला परतत होते. ‘एक्स्प्रेस वे’वर वाटेत त्यांच्या चारचाकीचे चाक पंक्चर झाले.
डॉ. खुर्जेकर यांचा चालक पंक्चर काढत असताना, खुर्जेकर त्याच्यासोबत थांबले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या लक्झरी बसने त्यांच्या चारचाकीला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की खुर्जेकरांच्या गाडीचा चक्काचूर झाला. तर डॉक्टर आणि ड्रायव्हर या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.
डॉ. केतन खुर्जेकर हे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीपाद खुर्जेकर यांचे चिरंजीव होते. दुर्दैवी योगायोग म्हणजे केतन यांचा त्याच दिवशी वाढदिवस होता. पण या आनंदाच्या दिवशीच खुर्जेकर कुटुंबावर मोठा आघात झाला.
या अपघातानंतर डॉ. खुर्जेकर यांच्या पत्नी, दोन मुली, आई-वडिलांनी संबंधित बसचा मालक आणि बसचा विमा उतरविलेल्या ‘इफ्को-टोकिओ’ कंपनीविरोधात मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला. या दाव्यात साडेतेरा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागण्यात आली होती.
हेही वाचा : कॅगचे अधिकारी मुंबई महापालिकेत थडकले, चौकशी सुरू; शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न
खुर्जेकर कुटुंबीयांच्या वतीने अॅड. एच. एस. बाठिया यांनी, तर विमा कंपनीच्या वतीने अॅड. सुनील द्रविड यांनी काम पाहिले. मोटार अपघात न्यायाधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हे प्रकरण ‘मध्यस्थी’साठी प्रशिक्षित मध्यस्थ अॅड. अतुल गुंजाळ यांच्याकडे सोपविले. त्यांनी या प्रकरणात यशस्वी मध्यस्थी केली.
त्यातून विमा कंपनीने डॉ. खुर्जेकर यांच्या कुटुंबीयांना पावणे सात कोटी रुपयांची भरपाई देण्याची तडजोड मान्य केली. त्यासाठी विमा कंपनीच्या प्रमुख रश्मी सिंग वर्मा यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना साजू अँथोनी, अमोल बिडवई, आश्विन कुमार गवई, मंगेश इनामदार या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साह्य केले.
हेही वाचा : रोड क्रॉस करताना दोन महिला पत्रकारांना कारने उडवलं; व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद, एकीचा जागीच मृत्यू