रायगड जिल्ह्यात पावसानं दाणादाण उडवली आहे. आज पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. महाड तालुक्यातील तळई गावात दरड कोसळल्यानं ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास ३५ घरांवर दरड कोसळल्याची माहिती असून ४० जणं अद्याप बेपत्ता आहेत. साखर सुतार वाडी येथेही दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं दोन घटनांमध्ये एकूण ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत ८० जण दबले गेले असल्याची माहिती ग्रामस्थांनी केली आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. तर, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे देखील घटनास्थळी पोहोचल्या असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
तळई गाव हे हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. मात्र काही वेळापूर्वी एनडीआरएफची टीम ज्यावेळी इथं पोहोचली त्यावेळी ही भयंकर घटना समोर आली. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. गेल्या काही तासांपासून इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.