श्रद्धाचं पत्र कुणी दाबलं? कुणाचा दबाव होता? आशिष शेलारांना वेगळीच शंका, काँग्रेस-NCP संशय!

मुंबई : श्रद्धा वालकर खून प्रकरणात दररोज नवनवे अपडेट समोर येत असताना आज भाजप नेते आशिष शेलारांनी नवा विषय छेडला आहे. आफताबकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र श्रद्धाने महाराष्ट्र पोलिसांना ठाकरे सरकारच्या सत्ताकाळात म्हणजेच नोव्हेंबर २०२० ला लिहिलं होतं. मग त्यावेळी पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी लिहिलेल्या पत्रानुसार तिच्या जीवाला धोका असून तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. महाराष्ट्र पोलिसांनी या पत्राची दखल का घेतली नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? असा सवाल करणारं ट्विट आशिष शेलार यांनी केलंय. त्यांच्या या ट्विटचा रोख तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आहे.

सरकारमध्ये बसलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थन होते म्हणून? की या सर्व प्रकारावर पांघरूण घालायचे होते? या सगळ्याची चौकशी होणे ही काळाची गरज आहे. तत्कालीन पोलिस आणि सरकारने कडक कारवाई केली असती तर श्रद्धा आज वाचली असती, असंही आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

आशिष शेलार यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटलंय, “माझी पोलिसांना विनंती आहे की, हे पत्र दाबण्यात आले का? याची चौकशी दडपण्यात आली का? आफताबवर कारवाई होऊ नये याबाबत कुणाचे दडपण होते का? या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे.”

आशिष शेलार यांचे काही प्रश्न…

श्रध्दा वालकरने महाराष्ट्र पोलीसांना दिलेल्या पत्रावर आता पोलीस आम्ही दोन्ही कुटुंबांना बोलावून समज दिली असेही सांगू शकतात. म्हणून आमचे काही प्रश्न….
१) दखलपात्र गुन्हा अदखलपात्र करुन हा विषय “टेबलावर” मिटवण्यात आला का?
२) तक्रार मागे घेण्यासाठी श्रध्दावर दबाव आणला गेला का?
३) गंभीर गुन्हा घडू शकतो याची स्पष्ट कल्पना पिडीता देत असल्याने गुन्हा दाखल करुनच चौकशी का केली नाही?
४) प्रकरण दाबले तर त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानंतर पोलीसांनी नजर का ठेवली नाही?
५)हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीसांवर कुणाचा दबाव होता का?
६) तक्रारीचा दखल घेण्यासाठी एक महिन्याचा विलंब का झाला?
७) पोलिसांनी दोन्ही कुटुंबाकडून जे लेखी घेतले त्यामध्ये तारखांची खाडाखोड का?
८) श्रध्दाच्या खूनानंतर तत्कालीन सत्ताधारी पक्षांनी निषेध का केला नाही?
गोलमाल है…म्हणून चौकशी व्हायलाच हवी!

पत्रावर कारवाई का नाही? चौकशी करणार : फडणवीस

हे पत्र माझ्याकडेही आलं आहे. हे पत्र फार सिरियस आहे. या पत्रावर त्यावेळी कारवाई का केली गेली नाही, याची चौकशी करण्याची गरज आहे. येत्या काळात त्याची चौकशी केली जाईल. मी यात कुणावरही टीका-टिप्पणी करणार नाही. पण अशा प्रकरणात जर कारवाई करण्यासंबंधी टाळाटाळ केली गेली तर अशा घटना होतात. त्यामुळे याची जरुर चौकशी होईल, अशी आक्रमक पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना घेतला.

Source link

ashish shelarshraddha walkershraddha walker death caseUddhav Thackerayआशिष शेलारउद्धव ठाकरेश्रद्धा वालकरश्रद्धा वालकर खून प्रकरण
Comments (0)
Add Comment