मुलांच्या लग्नानंतर नवस फेडला, प्रताप सरनाईक यांच्याकडून तुळजा भवानी चरणी ७५ तोळं सोनं अर्पण

उस्मानाबाद : शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजा भवानीला ७५ तोळे सोने अर्पण केलंय. आमदार सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून जवळपास ३७ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने देवीचरणी अर्पण करण्यात आले आहेत. संपूर्ण सरनाईक कुटुंबाने मनोभावे देवीचं दर्शन घेऊन केलेला नवस फेडला. दोन्ही मुलांची लग्न होऊन सगळं काही व्यवस्थित होऊ देत, असा नवस सरनाईक यांनी देवीला बोलला होता. त्यानुसार आज सरनाईक कुटुंबाने तुळजा भवानीला येऊन नवसपुर्ती केली.

“तुळजाभवानी देवी आमची कुलदैवत आहे. दोन्ही मुलांच्या लग्नाच्या वेळी आम्ही देवीला नवस बोललो होतो. आज माझ्या नातवंडांचं जावळ करायचं होतं. त्यामुळे नवस फेडण्यासाठी आम्ही सगळे कुटुंबीय देवीला आलेलो आहोत. ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्यांचा हार असा नवस मी देवीला बोललो होते. त्यानुसार आज सगळ्या कुटुंबाला घेऊन मी देवीचरणी लीन झालो. नवस फेडला”, अशा भावना प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केल्या.

“कोरोनाच्या काळामध्ये खूप निर्बंध असल्याने यायला जमलं नव्हतं. मध्यंतरी कुटुंबावरही काही संकटं आली होती. त्यामुळे तेव्हाही देवीला यायला जमलं नव्हतं. मात्र आज पूर्वनियोजन करुन आम्ही सगळे कुटुंबीय देवीला आलेलो आहोत. वर्षभरातून दोन-चार वेळा तरी देवीच्या दर्शनाला येत असतो. पण आज खास नवस फेडायला आलो”, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

“पहिल्या मुलाच्या लग्नाला ५१ तोळ्यांच्या पादुका आणि दुसऱ्या मुलाच्या लग्नाला २१ तोळ्याचा हार असा नवस आम्ही देवीला बोललो होतो. माझ्या पत्नीने तो नवस बोलला होता. दागिनेही २ वर्षांआधी बनवून ठेवले होते. पण मध्यंतरीच्या कोरोना काळात मंदिरेच बंद असल्याने नवस फेडणं जमलं नाही. पण काल परवा अचानक आम्ही इकडे येण्याचा निर्णय घेतला आणि आज नवस फेडला”, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

ईडीच्या केससंबंधी त्यांना यावेळी विचारलं असता त्यांनी अधिक बोलणं टाळलं. पण ही न्यायालयीन प्रक्रिया असून आमचा लढा सुरु आहे. कुठल्याही एका पक्षाने सांगितलं म्हणून अमुक-तमुक केस बंद करता येत नाही किंबहुना ते शक्य नाही. आमचा लढा सुरु आहे. प्रकरण कोर्टात असल्याने फार बोलणं उचित नाही, असं सरनाईक म्हणाले.

Source link

Pratap Sarnaikpratap sarnaik offer 75 tola goldpratap sarnaik tulja bhavani 75 tola goldshivsena mla pratap sarnaikप्रताप सरनाईकप्रताप सरनाईक ७५ तोळे सोने तुळजाभवानी
Comments (0)
Add Comment