हायलाइट्स:
- मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात
- पुढच्या 4 दिवसांमध्ये मुंबईसह राज्याला अतिवृष्टीचा इशारा
- मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर ढगाळ वातावरण
मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबईसह उपनगरांमध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरवली, मालाड आणि दहिसर या भागांमध्ये सकाळपासूनच ढगांची गर्दी झाली असून काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
खरंतर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या चार दिवसांमध्ये मुंबईसह राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर पावसाला सुरुवात झाली असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर देखील ढगाळ वातावरण आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये काळोख दाटल्याचं पाहायला मिळतं. मुंबईच्या बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईची पुन्हा तुंबई होणार का ? असाही प्रश्न आता उपस्थित होतो.
दरम्यान, मुंबई उपनगरांसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ९ ते १२ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होईल. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. इतकंच नाहीतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, प्रशासनानेही सतर्क राहत योग्य ती योजना आखावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी, या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सूचना कळवण्यात यावी असेही त्यांनी सांगितलं आहे.
अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक अशा सर्व ठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात याव्या, ओएनजीसीसह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात याव असंही ते यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.