देशमुख म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार भावनाताई गवळी यांनी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे, असं म्हटलं होतं. बरं झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र आहे, असं म्हटलं नाहीये, त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद करतोय, असा टोला देशमुख यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले, गेल्या काही दिवसांत भावनाताई बोलल्या की आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावान आहोत, पंतप्रधान मोदींचा फोटो लावून निवडून आलो. आता मुळात सर्व प्रसारमाध्यमासमोर सांगतो की वारंवार भारतीय जनता पार्टीचे नेतेसुद्धा हेच आरोप करतात की आम्ही मोदी यांच्या फोटोवर निवडून आलो. मोदींमुळे महाराष्ट्रात निवडून आलो, तुमच्या कल्पनेसाठी २०१९ च्या निवडणुकीमध्ये विधानसभेला फक्त मोदींचा फोटो युती असल्यामुळे या महाराष्ट्रात लावला गेला. मात्र, याच्या अगोदर मोदीजीचा फोटो या महाराष्ट्रात कोणत्याच निवडणुकीला लागल्या गेलेला नाहीये, ज्यावेळेस म्हणजेच २०१४ निवडणुकीत मोदींचा फोटो या महाराष्ट्रात युतीमध्ये शिवसैनिकांनी लावला. त्यावेळेस शिवसेनेचे आमचे संख्याबळ कमी झाले. म्हणजे मोदीजीचा फोटो लावल्यामुळे शिवसेनेचे आमदार कमी झाले, शिवसेनेचे जनमत कमी झाले.
२०१४ च्या विधानसभेला शिवसेना स्वबळावर लढली. त्यावेळेस कोणत्याच प्रकारचा पंतप्रधान मोदींचा फोटो या महाराष्ट्रात शिवसैनिकांनी लावला नव्हता, ना उमेदवारांनी लावला होता. त्यावेळेस शिवसेनेचे ६३ आमदार ह्या महाराष्ट्रात निवडून आले. आणि २०१४ च्या पूर्वी मोदींचा या महाराष्ट्राशी संबंध नव्हता, या देशाशीही संबंध नव्हता. ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. आणि २०१४ च्या पूर्वी तर कधी भारतीय जनता पार्टी सुद्धा या विधानसभेला महाराष्ट्रात कोणती निवडणूक असेल तेव्हा म्हणजेच त्याच्या पूर्वी मोदींचा फोटो लावत नसे. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की मोदींचा फोटो बॅनरवर लावल्यामुळे शिवसेनेचे मोठं नुकसान झालं. त्यावेळी शिवसेनेचे आमदार कमी झाले, आमचं संख्याबळ कमी झालं. २०१४ मध्ये शिवसेना ज्यावेळेस स्वबळावर लढली. तेव्हा मोदींचा फोटो लावला नाही, त्यावेळेस आमचे महाराष्ट्रामध्ये ६३ आमदार निवडून आले, असे नितीन देशमुख म्हणाले.