‘माझ्या भाजप प्रवेशाच्या उगाच काहीतरी चर्चा घडवल्या जातात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्यानंतर मी या भेटीमागील कारण अनेकदा स्पष्ट केलं आहे. शिवप्रताप गरूडझेप या चित्रपटाच्या स्क्रीनिंगची मागणी करण्यासंदर्भात मी त्यांना भेटलो होतो. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर भगवा झेंडा लावण्यात यावा आणि शिवनेरीवर रोप वे तयार करावा, अशा मागण्या मी केल्या होत्या, एवढाच स्पष्ट उद्देश होता,’ असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केला आहे.
केंद्र सरकारवर टीका करत राजकीय दिशा केली स्पष्ट
कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितल्यामुळे पुन्हा एकदा सीमावाद निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना खासदार कोल्हे यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. ‘शरद पवारसाहेबांनी कालच सीमाप्रश्नी पुन्हा एकदा ठामपणे भूमिका मांडली आहे. बेळगाव, कारवार निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, ही जी तिथल्या लोकांची भावना आहे तीच महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेची भावना आहे. महाराष्ट्रात भाजपचे उपमुख्यमंत्री आहेत, कर्नाटकातही भाजपचेच मुख्यमंत्री आहेत. तसंच सुप्रीम कोर्टात हा प्रश्न प्रलंबित असताना विनाकारण आता या प्रश्नाला हवा दिली जात आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारी यासारखे प्रश्न असताना त्यावरून लक्ष हटवण्यासाठी तर असे प्रयत्न केला जात नाहीत ना,’ अशी शंका अमोल कोल्हे यांनी उपस्थित केली आहे. त्यामुळे भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत कोल्हे यांनी आपली आधीची राजकीय भूमिकाच कायम असल्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, ‘शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला पाच वर्षांसाठी संधी दिली आहे. त्यामुळे शरद पवारसाहेब आणि आमच्या लोकसभेतील गटनेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली मी मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे,’ असंही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.