वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गटात आठवडी बाजारात वाद निर्माण झाला. शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे गट व ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत राजकीय चिखलफेक सुरू आहे. वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरणारे यांनी शिंदे गटाला समर्थन दिले तर पक्षाचे पदाधिकारी अविनाश पाटील गलांडे यांनी ठाकरे गटाला समर्थन दिले. ज्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक विविध माध्यमांवर होत होती. हा संघर्ष एवढा वाढला की, दोघांनी थेट वैजापूर तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या सरला बेटावर महाराजांच्या समाधीवर हात ठेवून वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले होते.
दरम्यान, आज पुन्हा रमेश बोरणारे हे महालगाव येथे मराठवाडा भांडी भंडार या दुकानाच्या उद्घाटनासाठी आले असता उद्घाटन आटोपून ते माजी पंचायत समिती सदस्य बापू झिंजूरडे यांच्या घरी चहापानासाठी गेले. यावेळी अविनाश गलांडे व त्यांच्या समर्थकांनी राम मंदिर परिसरात काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करत आमदारांचा निषेध केला. त्यातच आमदार बोरणारे हे झिंजूर्दे यांच्या घरून परतत असताना गावाच्या वेशीजवळ पुन्हा अविनाश गलांडे यांच्या समर्थकांनी झेंडे दाखवत घोषणा दिल्या. त्यामुळे दोन्ही गटात बाचाबाची झाली.
या वादानंतर घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.