फक्त कलाकार नाही तर व्यापक सामाजिक भान असलेला व्यक्ती आज आपल्यातून गेला : फडणवीस

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असल्याची शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या २ आठवड्यांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले विक्रम गोखले यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचं भरुन न येणारं नुकसान झाल्याची भावना दिग्गज मान्यवर मंडळी व्यक्त करत आहेत.

आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणार्‍या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणार्‍या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना!

संवेदनशील अभिनेता हरपला : शरद पवार

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी तिन्ही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला.

अभिनय कौशल्य व अनोख्या संवादशैलीने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, अशा भावना व्यक्त कपताना ५० वर्ष रंगभूमीची अविरत सेवा करत सामाजिक बांधिलकी जपणारे हरहुन्नरी कलावंत विक्रम गोखले यांना पवारांनी श्रद्धांजली वाहिली.

Source link

devendra fadanvismarathi actor vikram gokhale deathvikram gokhale deathvikram gokhale death reasonvikram gokhale passed awayvikram gokhale passes away at 77विक्रम गोखलेविक्रम गोखले चित्रपटविक्रम गोखले निधन
Comments (0)
Add Comment