पोलिसांना फोन येताच त्यांनी लागलीच त्याच्या घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातल्या सिरसो गावातील आहे. हितेश बबनराव मोरे (वय २७) असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे त्याच तालुक्यात एका शेतकऱ्यानेही स्वत:च्या शेतात विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातल्या सिरसो गावात रहिवासी असलेला हितेश मोरे याचे बायकोसोबत भांडण झाले होते. या किरकोळ भांडणातून बायको गेल्या अनेक दिवसांपासून माहेरी गेली होती. तो तिला आणि मुलाला घ्यायला काल अमरावती जिल्ह्यातील आसेगाव इथे म्हणजे बायकोच्या माहेरी गेला. यावेळी सासू-सासर्यांनी तिला पाठवण्यासाठी नकार दिला आणि माहेरच्यांनी म्हणजे सासऱ्यांनी हितेशला मारहाण केली.
त्यानंतर हितेश घरी परतला आणि ११२ पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला. “मला सासू-सासऱ्याने मारहाण केली आहे, मी आत्महत्या करतोय”, असं हितेशने पोलिसांना सांगितलं. मूर्तिजापुर ग्रामीण पोलिसांनी लागलीच हितेशच्या घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हितेशने घरात गळफास घेत आपलं जिवन संपवलं होतं. दरम्यान, या घटनेची मुर्तीजापुर ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत प्रकाश श्रीराम मकेश्वरने (वय ४२) यांनी स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही घटना मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. प्रकाश मकेश्वरांनी कर्ज काढून तीन एकर शेतात पेरणी केली. परंतु अतिवृष्टीमुळे पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. तर तूर पिकावर विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पेरणीसाठी लावण्यात आलेला खर्च ही निघत नव्हता.
याच नैराशातून प्रकाश मकेश्वर यांनी काल शुक्रवारी रात्री स्वतःच्या शेतात विष प्राशन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेत मुर्तीजापुर शहर आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीय.