मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानात शिवसेनेच्या गटप्रमुखांना संबोधित केल्यानंतर आणि शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची तिसरी सभा माँ जिजाऊ यांच्या भूमीत बुलढाण्याच्या चिखलीत पार पडली. एकनाथ शिंदे यांचं ‘भविष्य’, भावना गवळी यांची ‘राखी’, अब्दुल सत्तार यांचा उल्लेख ‘अब्दुल गटार’ तर फडणवीसांची लाज काढत उद्धव ठाकरे भाजप शिंदे गटावर तुटून पडले.
मध्य प्रदेश सरकारने ६५०० कोटी स्वत: देऊन शेतकऱ्यांची वीजेची बिलं माफ केली होती. महाराष्ट्रात मात्र सावकारी पद्धतीने वीज बिलांची वसुली होतीये, अशी फडणवीसांची ऑडिओ क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंनी देवेद्रांची लाज काढली. तसेच आम्हाला सल्ले देणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने आता शेतकऱ्यांची वीजेची बिलं माफ करावीत, असं आव्हान दिलं. त्यांच्या याच चॅलेंजला फडणवीसांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं.
काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही…! २०१९ ते २०२२ या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय… जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही… महावितरणचा हा आदेश २२ नोव्हेंबर २०२२ रोजीच जारी झालेला आहे… शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असं ट्विट करुन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री मिंधे यांनी ज्योतिषाला हात दाखवला, आज कामाख्या देवीच्या दर्शनासाठी ४० रेडे घेऊन ते गुवाहाटीला गेलेत. ज्यांना स्वत:चं भविष्य माहिती नाहीत, ते काय आपलं भविष्य घडवणार? त्यांचं भविष्य दिल्लीश्वरांच्या हातात आहे. उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली.