अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या कार्ला गावात माकडांचा मोठ्या प्रमाणात हैदोस होता. घराच्या छतावर उड्या मारणे, गावकऱ्यांच्या अंगावर धावणे, थेट घरात घुसून मिळेल त्या गोष्टींवर ताव मारणे, शेतीच्या पिकांचे नुकसान करणे, यामुळे नागरिक भयानक त्रस्त झाले होते. या माकडांचा त्रास कमी करण्यासाठी नागरिकांनीच उपाययोजना करण्यास सुरुवात केली. गावातली काही पुढारी व्यक्तींनी २५ ते ३० हजार रूपये जमा केले. त्यानंतर औरंगाबाद येथील सिल्लोडच्या काही खासगी व्यक्तींना माकडं पकडण्यासह त्यांना घेवून नेण्याचा कंत्राट दिला. ही सिल्लोडची टीम काल शुक्रवारी रात्री गावात पोहोचली. आज शनिवारी सकाळी सात ते आठ लोकांनी ३५ पेक्षा अधिक माकडे पकडून घेवून गेले. लोखंडी पिंजऱ्यामध्ये या सर्व माकडांना नेण्यात आले. माकडांचे अनेक लहान पिल्ले सुद्धा यामध्ये होते. मात्र, अनेक माकडांची पिल्ले रस्त्यावर भटकत आहेत.
दरम्यान, अकोला आणि पातुरच्या वन विभागाला या गोष्टीची काही कल्पना सुद्धा नव्हती. तसेच गावकऱ्यांनी देखील वनविभागाला कळवले नाही. मात्र, माकडे पकडून नेत असताना काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केले असून सध्या त्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता वन्यप्रेमींनी माकडांचा अशाप्रकारे बंदोबस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
माकडांना अटकाव करणं ग्रामस्थांच्या अंगाशी
माकडांना अटकाव करणं आता ग्रामस्थांच्या अंगाशी येणार आहे. दरम्यान, कार्ला गावातील माकडांचा अशाप्रकारे बंदोबस्त करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची वन विभागाकडून चौकशी केली जात आहे. यामध्ये जो कोणी दोषी आढळला त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. आमच्याकडून माकडे पकडण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही, असं अकोल्याचे वनविभागाचे उप वनसंरक्षक के. आर. अर्जुना यांनी ‘मटा ऑनलाइन’शी बोलतांना माहिती दिली.
संजय राऊतांकडून शिंदे गटातील आमदारांचा पुन्हा रेडे असा उल्लेख; पाहा संपूर्ण भाषण