हिंदुहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन कसं? अशी विचारणा करत सत्तेसाठी किती लाचारी, सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी?, असं ट्विट करत भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना डिवचलं होतं. याच ट्विटवर अंधारे यांना आज नाशिकच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली.
“संबंधित व्हिडीओ १० ते १५ वर्षांपूर्वीचा आहे. वादविवाद स्पर्धेचा तो व्हिडीओ असून समोरच्या म्हणण्याचं खंडन करण्याचा मी प्रयत्न करतीये. मात्र असा अर्धवट व्हिडीओ नीतू दाखवण्याचा प्रयत्न करतोय… मी समजू शकतेय की कणकवलीत जाऊन घेतलेला होमवर्क राणेंच्या जिव्हारी लागलाय.. त्यांची कानशिलं लाल झालेली आहेत. अशा काळात त्यांचं अस्थिर होणं, नैराश्यात बोलणं मी समजू शकते”, अशी टोलेबाजी अंधारे यांनी केली.
पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, “आपला नीतू आणि नीलू हे माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यात त्यांचा अभ्यास कमी आहे. वर आमच्या भावाचं म्हणजे नारायणरावांचं त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यांना संस्कार देण्यात आणि वळण लावण्यात माझा भाऊ कमी पडलाय. पण हरकत नाही आपलेच भाचे आहेत, आपण समजून घेऊयात…”
आमदार मंत्री गुवाहाटीला, राज्यात कोण लक्ष देणार?
“उद्धवजी मंत्रालयात जात नव्हते, अशी त्या लोकांची तक्रार होती. आताचे मुख्यमंत्री तरी कुठे मंत्रालयात जातात? ते गणपती, नवरात्र, आणि पितृ पक्ष जेवायला जातात. त्यातून वेळ मिळाला ती ज्योतिषाला हात दाखवायला जातात. राज्याचे आमदार-मंत्री जर दोन दिवस गुवाहाटीला गेले तर इकडे राज्यात कोण लक्ष देणार?” असा सवाल सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला विचारला. तसेच येत्या १६, १७ आणि १८ तारखेला मी नाशिक जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेकरिता येणार असल्याची माहिती यावेळी अंधारे यांनी दिली.