यावेळी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचं राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनसेची आंदोलनं विस्मरणात जातील यासाठी काही जणांकडून स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात येत आहेत. परंतु, मनसेच्या आंदोलनावर पुस्तिका काढणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली.
‘शिंदे यांनी एका रात्रीत जादूची कांडी फिरवली’
मनसे गटाध्यक्षांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना ही धारेवर धरलं. ते म्हणाले की, स्वत:च्या स्वार्थासाठी कोणाचाही हात हातात घेऊन मागे जाऊन बसणाऱ्यांपैकी मी नाही. प्रकृतीचे कारण सांगून घरात बसणाऱ्यांमधला मी नाही. एकनाथ शिंदे यांनी एका रात्रीत जादूची कांडी फिरवली. आता राज्यभर फिरत आहेत. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का? असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांनी यावेळी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला. गुजराती आणि मारवाडी लोक महाराष्ट्रातून बाहेर गेले तर काय होईल? या राज्यपालांच्या वक्तव्यावरुन राज ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. “गुजरातच्या आणि मारवाड्यांना प्रथम विचारा की, तुमच्या राज्यातून उद्योगासाठी तुम्ही महाराष्ट्रात का आलात? उद्योग धंद्यांसाठी महाराष्ट्रात सुपीक जमीन आहे म्हणून दुसऱ्या राज्यातील लोक येथे उद्योगांसाठी येत आहेत. महाराष्ट्र मोठा होता आणि तो कायम मोठा राहिल. महाराष्ट्रात काय आहे हे कोश्यारींकडून ऐकायचं नाही, असा टोला राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.