राज ठाकरे यांची सभा संपन्न झाल्यावर एका कार्यक्रमात संजय राऊत यांना पत्रकारांनी ‘मनसे’च्या सभेवर आणि उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रश्न विचारले. पत्रकारांचा प्रश्न संपतो ना संपतो तोच राऊतांनी आक्रमक होत त्यांच्यावर अजिबात प्रश्न विचारु नका म्हणत पत्रकारांना सुनावलं. यावेळी राऊत कमालीचे चिडले. मनसेच्या सभेवर किंवा राज ठाकरेंवर मला कोणतेही प्रश्न विचारु नका, अशी सूचना त्यांनी उपस्थित पत्रकारांनी केली.
“मी शिवसेना पक्षाचा खासदार आहे, नेता आहे. मला शिवसेना पक्षावर प्रश्न विचारा. कोण काय भाषण करतंय, कोण काय मुद्दे मांडतंय, यासाठी शिवसेना पक्ष नाही. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून घ्यायची. बरं त्यांचे लोक तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला आहेतच की… मला त्यांच्यासंबंधी अजिबात प्रश्न विचारु नका. मला शिवसेनेवर प्रश्न विचारा- मी उत्तरं देतो”, असं राऊत म्हणाले.
राऊत नेमके का चिडले?
साधारण सहा महिन्यांपूर्वी पुण्यात राज ठाकरे यांची स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा सभागृहात सभा पार पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी संजय राऊतांवर सडकून टीका केली होती. राऊतांनी जास्त बोलू नये. त्यांनी आता एकांतात बोलण्याचा सराव करावा, असं सांगत राऊतांना जेलमध्ये जावं लागेल, अशी अप्रत्यक्ष भविष्यवाणीच राज यांनी वर्तवली. बरोबर साडे-तीन महिन्यांपूर्वी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राऊतांना जेलवारी झाली.
मागील दोन आठवड्यांपूर्वी राऊत १०३ दिवस तुरुंगावास भोगून जामिनावर बाहेर आले. जेलमधून सुटल्यानंतरच्या पहिल्याच भाषणात त्यांनी राज ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करतानाच दुश्मनाबद्दलही असं वाईट चिंतू नये, असा सल्ला दिला. एकेकाळचे जीवलग दोस्त राज ठाकरेंनी आपल्याबद्दल असं चिंतल्याने राऊत दुखावले. त्यातूनच त्यांनी राज ठाकरेंना सल्ला देताना आपल्या मनातली खंतही बोलून दाखवली. तीच खंत राऊतांच्या मनात आजही आहे. त्यामुळे जेव्हा आज राऊतांना राज यांच्यावर प्रश्न विचारला गेला, त्यावर त्यांनी पत्रकारांना सुनावत त्यांच्यावर बोलणार नाही, असं सांगून अजूनही आपल्या मनात त्यांच्याविषयी नाराजी असल्याचंच सूचित केलं.
राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेचे बाण सोडले सुरुच ठेवले. स्वत:च्या आजारपणाचं कारण सांगून मुख्यमंत्रिपदावर असताना उद्धव घराबाहेर पडले नाहीत आणि परवा बुलढाण्यात जाऊन सभा घेतली. स्वत:च्या अंगावर एक केस नाही. कधी कुठली भूमिका घेतली नाही. केवळ आणि केवळ पैशांसाठी म्हणून राजकारण केलं, अशी जोरदार टीका करतानाच एकनाथ शिंदेंनी जादूची कांडी फिरवली सगळं व्यवस्थित झालं, असा टोलाही राज यांनी लगावला.