मनी लाँड्रिंग प्रकरण : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचे दुसरे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना जामीन मंजूर

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे दुसरे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनाही विशेष पीएमएलए न्यायालयाकडून सोमवारी जामीन मंजूर झाला.

अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर भ्रष्टाचाराचे पैसे आपल्या शिक्षण संस्थेत वळवल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यात देशमुख यांचे चिरंजीव सलील व ऋषिकेश यांनाही आरोपी करण्यात आले. ‘ईडी’कडून एक वर्षापूर्वी अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर ऋषिकेश यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. तो अर्ज प्रलंबित असतानाच यावर्षी ४ ऑक्टोबरला अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. त्यानंतर सलील यांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम ८८अन्वये जामिनासाठी अर्ज केला. तो विशेष पीएमएलए न्यायालयाने मंजूर केला. त्यानंतर ऋषिकेश यांनी २२ नोव्हेंबरला आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला. तसेच त्यांनी अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत कलम ८८ अन्वये जामीन अर्ज केला. याबाबत न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. ‘ईडीने माझ्या वडिलांवर आरोप लावून गुन्हा दाखल केला आहे. मात्र, कोणतेही कारण नसताना त्या आरोपांची व्याप्ती वाढवली आणि मलाही सहआरोपी करण्यात आले. मी तपासात पूर्ण सहकार्य केले आहे. त्यामुळे अटी लावून मला जामीन मंजूर करण्यात यावा’, अशी विनंती ऋषिकेश यांच्यामार्फत करण्यात आला. ती मान्य करत न्यायाधीशांनी ऋषिकेश यांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, अनिल देशमुख यांना या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी सीबीआय प्रकरणात अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यांचा अर्ज सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

Source link

anil deshmukh's second son hrishikesh deshmukhcurroptionEdhrishikesh deshmukh was granted bailmoney launderingmumbai news
Comments (0)
Add Comment