विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण दौऱ्यावर जाताना कोल्हापुरात त्यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा, मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. पण कधी ना कधी येथेही विरोधक निवडून आलेच ना. म्हणून बालेकिल्ल्याला धडक मारण्यासाठी आपण आता पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहे. मुंबई महापालिकेत कुणाशीही युती न करता स्वतंत्र लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले.
मी कधी भाजपसाठी तर कधी महाविकास आघाडीसाठी काम करतो , असा आपल्यावर आरोप होतो. पण तसे काहीच नाही. मी जे काम करतो, ते केवळ पक्षासाठी, माझ्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी असा खुलासा त्यांनी केला. मनसेचा विस्तार झाला नाही असा जो आरोप केला जातो, त्यांनी भाजपचा जन्म कधीचा, शिवसेना किती वर्षाने मुंबई महापालिकेत सत्तेवर आली हा इतिहास तपासावा, असा टोला मारला. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, वेळ यावी लागते. मनसेचेही दिवस नक्की येतील, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक केला.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका करताना पदावर बसलेल्या काहींना पोच नसते त्याचा हा पुरावा असल्याचे ते म्हणाले. यांना कुणी तरी स्क्रिप्ट लिहून देते का अशी विचारणा करतानाच केवळ मुळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठीच हे होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीवरुन चेष्टा केली नाही, परिस्थितीबाबत बोललो होतो: राज ठाकरे
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही राज ठाकरेंनी हल्ला चढविला. पदावर असताना विविध कारणे पुढे करत ते जनतेपासून दूर राहिले. आताच त्यांना जनता कशी आठवते असा सवाल करून ते म्हणाले, ती प्रकृतीची चेष्टा नव्हती तर परिस्थितीची होती. यावेळी पुंडलिक जाधव, राजू दिंडोर्ले, राजू जाधव, विजय करजगार आदि उपस्थित होते.
राज ठाकरेंना तांबडा-पांढरा रस्सा खाण्याची इच्छा
या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी आपल्या कोकण दौऱ्याविषयी माहिती दिली. कोकणात जाण्यापूर्वी अंबाबाईचे दर्शन घ्यावे, यासाठी मी कोल्हापूरमध्ये आलो आहे. उद्या सकाळी १० वाजता मी अंबाबाईच्या दर्शनाला जाईन. त्यानंतर चांगला तांबडा-पांढरा रस्सा मिळाला तर खाईन, असे राज ठाकरे यांनी म्हटले.