नाराज उदयनराजे प्रतापगडावरच्या कार्यक्रमाला गैरहजर ; एकनाथ शिंदेंचे मनधरणीचे प्रयत्न विफल

Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 30 Nov 2022, 4:07 pm

Maharashtra Politics | भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर छत्रपती घराण्याचे वंशज असलेले छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती हे दोघेही आक्रमक झाले होते. उदयनराजे भोसले यांनी दोनवेळा पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल कोश्यारी यांना पदमुक्त करावे, ही मागणी लावून धरली होती. त्यामुळे आता कोश्यारी यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

उदयनराजे भोसले नाराज

हायलाइट्स:

  • उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती.
  • शिवाजी हे जुने झाले, असे कोश्यारी यांनी म्हटले होते.
सातारा: खासदार उदयनराजे भोसले आज प्रतापगडावर आयोजित राज्य सरकारच्या सोहळ्यात सहभागी झाले नाहीत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर कारवाईच्या मागणीवर ठाम असलेले उदयनराजे यांनी प्रतापगडावरच्या सोहळ्याला गैरहजर राहून आपली नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणावरून उदयनराजेंनी फोन करून आपण सोहळ्याला का आला नाहीत याबाबत विचारणा केली. त्यावर उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केल्याचे समजते. या माध्यमातून उदयनराजे भोसले यांनी शिंदे-फडणवीस सरकारला स्पष्ट इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी हे जुने झाले. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले होते.

भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर छत्रपती घराण्याचे वंशज असलेले छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती हे दोघेही आक्रमक झाले होते. उदयनराजे भोसले यांनी दोनवेळा पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल कोश्यारी यांना पदमुक्त करावे, ही मागणी लावून धरली होती. मध्यंतरीच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा अर्थ तसा नव्हता, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, विरोधक आणि उदयनराजे भोसले यांनी हा मुद्दा लावून धरल्याने हा मुद्दा सतत तापता राहिला.

उदयनराजे भोसले यांचा निर्वाणीचा इशारा

उदयनराजे भोसले यांनी अलीकडेच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याचा आग्रह धरला होता. कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश उदयनराजे भोसले यांनी दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करायचे, त्यांच्या नावाने उड्डाणपूल आणि रेल्वे स्थानके उभारायची आणि त्यांचा अपमान झाल्यावर कोणालाही काही वाटत नाही. असे करायचे असेल तर शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका, असा टोला उदयनराजे भोसले यांनी भाजपला लगावला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Bhagat Singh KoshyariCM Eknath ShindeMaharashtra politicspratapgad shivpratap dinUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेप्रतापगड शिवप्रताप दिनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Comments (0)
Add Comment