किल्ले प्रतापगडावर ३६४वा शिवप्रतापदिनाचा सोहळा बुधवारी पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी केलेल्या भाषणात लोढा यांनी महाविकास आघाडीची तुलना औरंगजेबाशी, तर शिंदे यांच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करून ठेवले होते. मात्र, शिवराय स्वत:साठी नाही, तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले; पण एकनाथ शिंदेदेखील महाराष्ट्रासाठी तिकडून बाहेर पडले,’ असे लोढा म्हणाले. लोढा यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने लोढा यांच्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघात निदर्शने केली. लोढा यांच्या विरोधात संतप्त घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. ‘सत्ताधाऱ्यांनी आता वाचाळवीरांना आवरावे,’ असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. ‘वादग्रस्त वक्तव्य करण्याची स्पर्धा मंत्री आणि नेत्यांमध्ये सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. मात्र, एका नेत्याने चूक केली, तर दुसरा त्याहून अधिक मोठी चूक करतो. हे कधी थांबणार,’ असा सवाल अजित पवार यांनी केला.
‘तुलना नाही; फक्त उदाहरण दिले’
विरोधकांच्या टीकेनंतर लोढा यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची मी कोणाशीही तुलना केलेली नाही. मी फक्त एक उदाहरण दिले होते. महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देणार नाही, तर कोणाचे देणार? छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्य आहेत आणि आम्ही जमिनीवर आहोत. यामुळे त्यांच्याशी तुलना करण्याचा मूर्खपणा कोणीच करू शकत नाही आणि. मीही कधीच करत नाही,’ असे सांगून लोढा यांनी त्यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
‘महाराजांची तुलना होऊ शकत नाही’
‘छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे, अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावर दिली.
‘सरकारने वाचाळवीरांना आवरावे’
‘वादग्रस्त वक्तव्य करण्याची स्पर्धा मंत्री आणि नेत्यांमध्ये सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. सत्ताधाऱ्यांनी आता वाचाळवीरांना आवरावे,’ अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.