‘माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत मी असले प्रकार करत नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. मी असं करू शकतो का? तुला तर माहीत आहे हे कोण करतंय, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
‘…म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गेलो नाही’
‘आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे महापालिकेने मला निमंत्रण दिलं आहे. मात्र पुलाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांपासून ८ फूट अंतरावर उभ्या असलेल्या माझ्यावर थेट ३५४ चा गुन्हा दाखल करण्यात आला. कदाचित आज त्यांच्या बाजूला मी उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील आणि नंतर सांगतील की राजकीय दबाव होता. त्यापेक्षा कार्यक्रमालाच न गेलेलं बरं,’ असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
दरम्यान, खरंतर मॉलमध्ये जेव्हा मी ‘हर हर महादेव’ हा चित्रपट बंद पाडला होता तेव्हाच माझ्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा डाव होता. कारण मला मुख्यमंत्र्यांनी नंतर सांगितलं की तेव्हा मीच तुला त्या प्रकरणातून वाचवलं होतं, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.