शाळेबाहेर वाट पाहत थांबला, मुलांना चॉकलेट दिले, काही वेळातच १७ विद्यार्थी झाले रुग्णालयात दाखल

म.टा. खास प्रतिनिधी, नागपूरः चॉकलेट खाल्ल्याने तब्बल १७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. सीताबर्डीतील मदनगोपाल अग्रवाल शाळेत शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. या विद्यार्थ्यांना लगेच सीताबर्डीतील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वेळीच उपचार मिळाल्याने सर्वच सुखरूप असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांना मधली सुटी झाली. त्यामुळे तिसरी, चौथी व पाचवीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी शाळेबाहेर आले. यावेळी त्यांना एक व्यक्ती चॉकलेट वाटप करीत असल्याचे दिसले. अन्य विद्यार्थीही तेथे गेले. ‘माझा वाढदिवस आहे. तुम्हीही चॉकलेट घ्या’, असे तो विद्यार्थ्यांना म्हणाला. विद्यार्थ्यांनी चॉकलेट घेऊन खाल्ले. त्यानंतर ते वर्गात परतले. काही वेळाने एकामागोमाग १७ विद्यार्थ्यांनी उलट्या करायला सुरुवात केली. वर्गशिक्षिकांनी मुख्याध्यापकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना जवळीलच लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे विद्यार्थ्यांवर लगेच उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर झाली. विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्या झाल्या. सध्या त्यांची प्रकृती धोक्यावर बाहेर आहे, तीन विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. २४ तास निरीक्षण केल्यानंतर त्यांनाही सुटी देण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्ष देशमुख यांनी दिली. -दरम्यान, सीताबर्डी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमके दिले कुणी?

पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता विद्यार्थ्यांनी वेगवेगळी माहिती दिली. वाढदिवस असल्याने एका व्यक्तीने चॉकलेट दिले, असे एका विद्यार्थ्याने सांगितले. तर अन्य एका विद्यार्थ्याच्या सांगण्यानुसार, काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या युवकाने चॉकलेट दिले. मास्क लावून आलेल्या युवकाने आम्हाला चॉकलेट दिल्याचे काहींचे म्हणणे आहे. शाळेच्या बाहेर सीसीटीव्ही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना चॉकलेट कुणी दिले, हे वृत्त लिहिपर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते. परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येणार असून त्याआधारे चॉकलेट देणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती सीताबर्डी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिली.

Source link

food poisoning cases in maharashtrafood poisoning cases in nagpurnagpur food poisoning newsnagpur live newsnagpur news today
Comments (0)
Add Comment