राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांच्या एकापाठोपाठ एक छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त व्यक्तव्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही या स्पर्धेत भाग घेतला. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी या महोत्सवाची माहिती देताना त्यांनी शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचं विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असं विधान करुन त्यांनी अकलेचे तारे तोडले. आमदार लाड यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतलेला असताना आता शिंदे गटानेही रोखठोक इशारा दिलाय.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही चुकीचे बोलत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही. छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाही, मंत्रीपद गेलं खड्ड्यात यांना सोडणार नाही, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही”
छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला : प्रसाद लाड
छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं वादग्रस्त विधान प्रसाद लाड यांनी केलं. त्यांच्या या विधानावर त्यांना करेक्ट करण्याचा प्रयत्न समोर बसलेल्या काही व्यक्तींनी केला. पण त्यानंतरही त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं नाही किंवा अनावधानाने बोललो, असंही म्हटलं नाही. एकीकडे राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरत असताना आता प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याने भाजपची अडचण वाढणार आहे.
भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो : प्रसाद लाड
छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी सारवासारव करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न प्रसाद लाड यांनी केला.