खरं तर काही महिन्यांपूर्वीच निलेश माझिरे यांनी संघटनेतील अंतर्गत राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीच त्यांनी मनसे सोडण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र, राज ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर निलेश माझिरे यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला होता.
निलेश माझिरे हे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक आहेत. वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याची चर्चा वारंवार डोकं वर काढत असते. याच पार्श्वभूमीवर निलेश माझिरे यांची आधी पदावरुन हकालपट्टी, आणि आता सोडचिठ्ठी या महत्त्वपूर्ण घटना मानल्या जात आहेत.
निलेश माझिरे शिवसेनेत जाण्याची चर्चा फार पूर्वीपासून होती. जून महिन्यात त्यांनी शिवसेना नेते सचिन अहिर यांची भेट घेतली होती. मात्र आताही ते ठाकरे गटाची वाट धरणार की शिंदे गटाची, याकडे लक्ष आहे.
मोरेंची नाराजी कशावरुन?
पक्षातील पदाधिकारी आपल्याला विश्वासात घेत नाहीत. बैठकांना बोलावत नाहीत. मेळावे-सभांना गेलं तरी भाषण करण्याची संधी मिळत नाही, असा आरोप करत वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच नाराजी व्यक्त केली होती.
मनसेचा पुणे विभाग सर्वस्वी राज ठाकरे यांच्यावरच अवलंबून आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही पक्षाने कुठलीही तयारी केलेली नाही. तसेच आजच्या घडीला निवडणूक लागल्यास पक्षाकडे निवडणुकीला उभे करता येईल एवढे उमेदवारही नाहीत, असा टोलाही मोरेंनी लगावला होता.
हेही वाचा : मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार? अजित पवारांची तात्यांना ऑफर
दरम्यान, अलिकडेच वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची भेट घेतली होती. त्यातच आता विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे दिग्गज अजित पवार यांनीही त्यांना पक्षात येण्याचं खुलं आवताण दिलं आहे. मोरेंची भगिनी मानल्या जाणाऱ्या रुपाली ठोंबरेंनीही ‘घड्याळ’ बांधलं आहे. त्यामुळे वसंत मोरे पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला रामराम ठोकूनन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात की काय, अशी चर्चा रंगली आहे.
हेही वाचा : आंदोलनाची आयोजकांनी कल्पना दिली नाही, आत्मक्लेश आंदोलनाच्या गैरहजेरीवर अमोल कोल्हेंच स्पष्टीकरण