संभवच्या मृत्यूमुळे बार्शीत वातावरण तापले होते
चिकर्डे गावात उपोषण सुरू असताना दिव्यांग संभव रामचंद्र कुरुळे (१०) याचा रविवारी दुपारी चारच्या सुमारास मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर शासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका मुलाचे वडील रामचंद्र कुरुळे व उपोषणकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे बार्शी तालुक्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
सोमवारी सकाळी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संजिवनी बारंगुळे यांनी कुरुळे कुटुंबांच्या घरासमोर प्रशासन चर्चा करीत असतानाच पोलिसांसमोरच डिझेलची बाटली अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला पोलिसांनी त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला.
कुरळे कुटुंबाच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त
बार्शी आणि चिकर्डे गावात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून रविवारी दुपारी चार वाजल्यानंतर कुरुळे कुटुंबाच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनील शेरखाने, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर नालकुल, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, वैराग, पांगरी, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.लेखी आश्वासनानंतर संभव कुरळेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बीडीओला सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी सुरू
बार्शी तालुक्यात नियुक्तीस असलेल्या गटविकास अधिकाऱ्यास जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी ताबडतोब सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तीन सदस्यीय समितीद्वारे एक महिन्यात चौकशी पूर्ण करुन संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे तहसीलदार सुनील शेरखाने यांनी लेखी आश्वासन दिले आहे.