महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्यं करण मंत्री चंद्रकांत पाटील यांना भोवलं. आज पिंपरीतल्या एका कार्यक्रमाला जात असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी शाईफेक केली. त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांच्या नावाने घोषणा दिल्या. पोलिसांनी तत्काळ शाईफेक करणाऱ्या अज्ञातांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट करताना भाजप कार्यकर्त्यांना कायदा हातात न घेण्याचं आवाहन केलं.
शाईफेक करणं हे भ्याडपणाचं लक्षण
प्रत्येकाने आपलं मत मांडायचं, ज्याला आवडलं नाही त्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करायचं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर हे सूत्र जपलं. पण आज माझ्यावरच्या हल्ल्याने महाराष्ट्रात झुंडशाही सुरु असल्याचं अधोरेखित झालं. पण ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही. याचं जे काही असेल ते मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बघून घेतील. मी कार्यक्रमाला चाललो आहे, मी नियोजित सगळे कार्यक्रम करणार आहे. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी घाबरत नाही. अशा प्रकाराने पराचा कावळा करणं, खुलासा करुनही शाईफेक करणं हे भ्याडपणाचं लक्षण आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
हिम्मत असेल तर समोर या, मी लढणारा कार्यकर्ता
“आज जर आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही मोकळीक दिली असती तर केवढ्यात पडलं? पण ही आमची संस्कृती नाही. शब्दाला शब्दाने टक्कर देता येते. काल संध्याकाळी मी दिलगिरी व्यक्त केली, आज सकाळीही मी दिलगिरी व्यक्त केली. गिरणी कामगाराचा मुलगा इथपर्यंत पोहोचला, हे सरंजामशाहीवाल्यांना झेपत नाहीये. विरोधी पक्षातल्या काही जणांना बघवत नाहीये. उद्यापासून पोलीस प्रोटेक्शन नसेल, हिम्मत असेल तर समोर या, असं आव्हान चंद्रकांतदादांनी दिलं.
“पोलिसांना दोष देण्याचं काही कारण नाही. मी पोलिसांना दोष देणार नाही. पोलिसांनी तरी कुणा-कुणावर लक्ष ठेवायचं. माझ्यावर शाईफेक झाली त्यावेळी माझ्यासोबत उपस्थित असणाऱ्या पोलिसाचं निलंबन वगैरे मी होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी हात जोडून विनंती करतो. विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मी घाबरत नाही. आज पोलिस प्रोटेक्शन निघालं की हिम्मत असेल तर समोर या.. काय संघर्ष करायचा ते पाहू आपण… खरं तर माझ्यावरचा हल्ला म्हणजे बाबासाहेबांचा अपमान… ही लोकशाही नव्हे तर झुंडशाही आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.