श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळून नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे ही थंडी वाढत आहे. तर, या वातावरणीय बदलांमुळे देशातील उत्तरेकडील राज्यात पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक शहरात दोन दिवसांपासून दिवसभर वातावरणात प्रचंड गारवा जाणवत असून, सकाळच्या प्रहरात काही प्रमाणात धुकेदेखील दाटत आहे. थंडीमुळे बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहारदेखील उशिराने सुरू होत असून, सायंकाळीदेखील नागरिक शक्यतो घरात राहणेच पसंत करीत आहेत.
कमाल तापमानात घट झाल्याने शनिवारी दिवसभर वातावरणात भयंकर गारठा जाणवला. या हुडहुडीमुळे नागरिकांनी उबदार कपडे वापरण्यास प्राधान्य दिले असून, दुपारच्या सुमारास काहीवेळ ऊन सावलीचा खेळ सुरू राहिला. यावेळी प्रतितास ४ ते ५ किलोमीटर वेगाने दिवसभर शीतलहरी वाहत होत्या. शनिवारी शहराचे किमान तापमान १०.४ अंश सेल्सियस असताना आर्द्रता ५० टक्क्यांपर्यंत घसरली होती. तीन दिवसांत शहरातल्या किमान तापमानात थेट चार अंशांनी घट झाल्याने गारठा वाढत गेला. वाऱ्याचाही वेग जास्त असल्याने नागरिकांना हुडहुडी भरली. गत आठवड्यात किनारपट्टीलगत काही ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्यामुळे तेथील थंड वारे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत.
वातावरणीय बदल का?
– बंगालच्या उपसागरात मंदोस चक्रीवादळ
– वादळामुळे राज्यात तापमानात घट
– उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात पारा घसरला
– पुढील दोन दिवस अंशत: ढगाळ वातावरण जाणवेल
– त्यावेळी पारा आणखी दोन अंशांनी घसरण्याचा वेधशाळेचा अंदाज
राज्यातील थंडीचा पारा
राज्यात सर्वात थंड ओझर व निफाडचे तापमान असून, त्या खालोखाल जळगाव ८.५, पुणे ८.९, बारामती ९.९, जालना १०.१, नाशिक १०.४, उस्मनाबाद ११.४, परभणी ११.५, मालेगाव १३.४, सांगली १४.२, नांदेड १४.५, मुंबई (सांताक्रुझ) १६.५, उदगीर १६.६, रत्नागिरी १७, सातारा १७.२ आणि माथेरान १७.६ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.