हायलाइट्स:
- पूर ओसरत असताना भयाण चित्र येतंय समोर.
- राज्यात अतिवृष्टीच्या तडाख्यात १३७ जणांचा बळी.
- ५० जण जखमी तर ७३ जण अद्याप बेपत्ता.
मुंबई: राज्यातील रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे आणि मुंबई या भागांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. यात अनेक भागांत पूरस्थिती उद्भवल्याने तसेच दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने किमान १३७ जणांचा बळी गेला आहे तर ७३ जण बेपत्ता असून ५० जण जखमी आहेत. ( Maharashtra Floods Latest Updates )
वाचा: खेडमध्ये दरडीखाली आढळले ८ मृतदेह; ९ गावकरी अजूनही बेपत्ता
राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पुराचा सर्वाधिक फटका बसला. यात रायगड, सातारा आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांत सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. महाड तालुक्यातील तळिये गावात दरड कोसळून त्याखाली अनेक घरे गाडली गेल्याने ४७ जणांचा बळी गेला आहे. एनडीआरएफच्या आकडेवारीनुसार तिथे अद्याप २३ जण बेपत्ता आहेत आणि त्यांचा ढिगाऱ्याखाली शोध घेण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात पूरसंकटाने एकूण ५२ जणांचा बळी घेतला आहे तर २८ जण जखमी आहेत. त्यानंतर सातारा जिल्ह्यात विविध दुर्घटनांमध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात २१ जणांचा बळी गेला असून १४ जण बेपत्ता तर ७ जण जखमी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू झाला असून १ जण बेपत्ता आहे. ठाणे जिल्ह्यात १२, पुणे जिल्ह्यात २, मुंबईत ४ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन जणांचा पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून १ लाख ३५ हजार ३१३ लोकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यात काही ठिकाणी स्थिती पूर्वपदावर येत आहे. सध्या राज्यात एनडीआरएफच्या ३४ टीम, एसडीआरएफच्या ४ टीम, कोस्ट गार्डच्या ३ टीम, नौदलाच्या ७ टीम, भारतीय लष्कराच्या तीन टीम बचावकार्यात उतरलेल्या आहेत.
वाचा: ‘महाराष्ट्र शोकाकुल आहे; कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नका’
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३७ मृत्यू
सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावळी तालुक्यात अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन २६ जणांचा मृत्यू झाला तर छत पडून १ जण, दरड कोसळल्यामुळे २ जण तर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने ८ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण ३७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. वाई तालुक्यातील कोंढावळे येथील २ महिलांचा भूस्खलनामुळे तर एका पुरुषाचा छत पडून मृत्यू झाला आहे. जावळी तालुक्यातील रेंगडी येथील २ महिला व वाटंबे येथील एका पुरुषाचा तर मेढा येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे. पाटण तालुक्यातील बोंद्री येथील एक पुरुष, जळव येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे. मंद्रुळकोळे येथील एका पुरुषाचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला आहे. आंबेघर तर्फ मरळी येथील ५ पुरुष व ६ महिलांचा तर काहीर येथील एका महिलेचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. रिसवड येथील २ पुरुष व २ महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला असून मिरगाव येथील ४ पुरुष व ४ महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. सातारा तालुक्यातील कुस बुद्रूक येथील एका महिलेचा व कोंडवे येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील घावरी येथील एका पुरुषाचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला आहे. पाटण तालुक्यात भुस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचा शोध व बचाव काम सुरू असून अद्यापही ५ नागरिक बेपत्ता असून जावळी व वाई तालुक्यातील प्रत्येकी २ व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले.
वाचा:पुन्हा महापुराचा धोका : राधानगरी धरणाचे ५ दरवाजे उघडले; नदीची पाणी पातळी वाढणार?