‘समृद्धी’चं उद्घाटन १ मे रोजीच होणार होतं, मात्र…; PM मोदी महाराष्ट्रात असतानाच उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या महामार्गामुळे मुंबई व नागपूर ही शहरे जवळ येणार असून उद्योगधंदे वाढून शेतकऱ्यांना दळणवळणास मदत होणार आहे. मात्र या महामार्गाच्या कामावरून श्रेयवादाची लढाईही रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महामार्ग उभारण्यासाठी आपण दिलेल्या योगदानाबाबत विविध दावे केले जात असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक नवा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेना भवन येथे आज ठाण्यातील आंबेडकर चळवळीतील नेते अॅड. दीपक गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून या सर्व कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून भाजप आणि मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. तसचं समृद्धी महामार्गाबाबतही भाष्य केलं. ‘समृद्धी महामार्ग आधीच सुरू व्हायला पाहिजे होता. महाविकास आघाडीचं सरकार असताना १ मे रोजी या महामार्गाचं उद्घाटन होणारही होतं. मात्र अचानक या रस्त्यावरील एक कमान पडली असल्याचं सांगण्यात आलं आणि उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं. मात्र खरंच ही कमान पडली की पाडली गेली?,’ अशी शंका उद्धव ठाकरेंनी उपस्थित केली आहे.

एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

सेनाभवनात पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘गेल्या दोन-चार महिन्यांपासून शिवसेनेत दररोज कोणाचा ना कोणाचा प्रवेश होत आहे. सर्वजण जिद्दीने पेटले आहेत. मी सत्तेवर नसतानाही तुम्ही पक्षात येत आहात. काही जणांना वाटलं फुटीनंतर शिवसेना संपली. मात्र मी म्हणजेच शिवसेना आहे, असं ज्यांना वाटत होतं, तेच संपले आहेत,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना काल तर कहर करत या भेटीनंतरही काही फरक पडणार नसल्याचं म्हटलं आहे. कर्नाटकात, महाराष्ट्रात आणि केंद्रात अशा तिन्ही ठिकाणी भाजपचं सरकार असताना सीमाप्रश्न तयार झाला आहे. १७ तारखेला मुंबईत होणाऱ्या मोर्च्यामध्ये महाराष्ट्र एकवटलेला दिसेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

Source link

Narendra Modisamruddhi express highwayuddhav thackeray shivsenaउद्धव ठाकरेपंतप्रधान नरेंद्र मोदीसमृद्धी महामार्ग
Comments (0)
Add Comment