नवऱ्याला बाहेरचा नाद, बाबा मी काय करु? असं गाऱ्हाणं एका महिलेने मांत्रिक बाबाकडे मांडलं. त्यावर हे प्रकरण सोडायला १५ हजार रुपये लागतील. पांढरी पावडर भाजीतून नवऱ्याला खाऊ घाल आणि त्याच्या गळ्यात मी दिलेला ताईत बांध, असे मांत्रिकांना संबंधित महिलेने सांगितले. महिलेने देखील मांत्रिकाला १५ हजार दिले. पण महिना इलटला तरी फरक पडत नसल्याने तिने मांत्रिकाला याबद्दल जाब विचारला. त्यावर मांत्रिकाने उलट सुलट उत्तर दिल्यानंतर संबंधित महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिने थेट कर्जत पोलीस ठाणे गाठले.
हायलाइट्स:
- नवऱ्याला बाहेरचा नाद, बाबा मी काय करु?
- मांत्रिक म्हणाला मला १५ हजार दे, अन् तुझ्या पतीला….
कर्जत तालुक्यातील एका महिलेच्या बाबतीत ही घटना घडली आहे. महिलेचा पती काही कामधंदा करत नाही. शिवाय तिला त्रास देतो. महिलेने ही कैफियत आपल्या शेजारीणीला सांगितली. शेजारणीने जळकेवाडी येथील नवनाथ मांडगे या मांत्रिकाला तिच्या घरी बोलावले. मांत्रिकाने यावर उपाय करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मांत्रिकेने महिला आणि तिच्या मुलीला समोर बसविले. त्यांच्यासमोर पाट मांडून त्यावर गहू ठेवले. तेथे अगरबत्ती लावून त्यावर ठेवलेला गव्हाचा एक-एक दाणा बाजूला काढला. ते गव्हाचे दाणे मोजले आणि म्हणाला, ‘बाई तुझे सर्व खरे आहे. तुझा नवरा काहीही कामधंदा करत नाही. त्याला बाहेरचे नाद आहेत.’ यावर उपाय म्हणून त्याने पांढऱ्या पावडरची पुडी महिलेला दिली. ती पावडर पंधरा दिवस नवऱ्याला भाजीतून चारण्यास सांगितले. सोबत तीन ताईत दिले. ते घरातील महिलांना गळ्यात बांधण्यास सांगितले. या बदल्यात त्याने पंधरा हजार रुपये घेतले. आणखी एक हजार रुपये नंतर दे असे सांगून तो निघून गेला.
काही दिवसांनी या मांत्रिकाची एका ठिकाणी भेट झाली तेव्हा त्याने राहिलेले एक हजार रुपये मागितले.
नवऱ्याला पावडर खायला घातली का? असे विचारले. मात्र पावडर खाऊनही काही फरक पडला नसल्याचे त्या महिलेने मांत्रिकाला सांगितले. मांत्रिक मात्र पैसे मागतच राहिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या महिलेने कर्जत पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक चंद्रशेख यादव यांच्यासमोर तिने कैफियत मांडली. पोलिसांनी महिलेला आधार देत तिची तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांनी मांत्रिकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.