हायलाइट्स:
- खेड तालुक्यात दरड दुर्घटनांत १७ जण अडकले.
- आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढले, ९ जण बेपत्ताच.
- एनडीआरएफ, लष्कराला स्थानिकांचीही साथ.
खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी व बिरमणी येथील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज दुपारपर्यंत ८ मृतदेह आढळले आहेत. यापैकी ७ मृतांची ओळख पटली आहे. दरम्यान, ९ जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. ( Khed Posare Landslide Latest Update )
वाचा: ‘त्या’ माऊलीला हुंदका आवरत नव्हता; हात जोडत मुख्यमंत्री म्हणाले…
तुफान पावसामुळे पोसरे बौद्धवाडी व बिरमणी येथे दरड दुर्घटना घडली असून खेड पोलीस, महसूल विभाग, एनडीआरएफ व लष्कर स्थानिकांच्या मदतीने युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करत आहे. गेल्या चार दिवसांपासून अविश्रांतपणे या यंत्रणा दगड आणि मातीचा ढिगारा उपसत आहेत. आतापर्यंत ८ मृतदेह ढिगाऱ्याखाली आढळले असून त्यातील सात जणांची ओळख पटली आहे.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
पोसरे बौद्धवाडी
विहान सुदेश मोहिते (वय ५), धोडीराम देऊ मोहिते (वय ७१), संगीता विष्णु मोहिते (वय ६९), सविता धोडीराम मोहिते (वय ६९), सुनीता सुनील मोहिते (४५)
बिरमणी
जयश्री जयवंतराव मोरे ( वय ६५), जयवंत भाऊराव मोरे (वय ७०)
वाचा: ‘सवंग लोकप्रियतेसाठी मी आत्ता लगेचच कोणतीही घोषणा करणार नाही’
नेमकं काय घडलं होतं?
राज्यात तुफान पावसाने हाहाकार उडाला आहे. त्याचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, लांजा, संगमेश्वर आणि राजापूर या तालुक्यांना बसला. अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. खेड तालुक्यातील पोसरे गावातही डोंगर खचला आणि भूस्खलन होऊन पोसरे बौद्धवाडी व बिरमणी येथे अनेक घरे गाडली गेली. गेल्या चार दिवसांपासून याठिकाणी बचावकार्य सुरू असून अद्याप ९ गावकरी बेपत्ता असल्याने हे बचाव आणि मदतकार्य सुरूच राहणार आहे. राज्यात विविध भागांत दरडी कोसळून ११२ हून अधिक मृत्यू झाले असून ९९ जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा
कोकणला महापुराचा तडाखा बसल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन स्थितीचा आढावा घेत आहेत. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी महाड येथील तळिये गावात जाऊन दरडग्रस्तांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. त्यानंतर मुख्यमंत्री आज चिपळूण दौऱ्यावर आहेत. महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण बाजारपेठेत मुख्यमंत्र्यांनी स्थितीचा आढावा घेतला व भरीव मदत करण्याचे आश्वासन पूरग्रस्तांना दिले.
वाचा: महाराष्ट्रात दरड कोसळून एकूण १०० हून अधिक मृत्यू, NDRF च्या ३४ टीम तैनात