मोदींचं भाषण एखाद्या पक्षाच्या नेत्यासारखं तर चंद्रकांत पाटलांचा कांगावा, पवार बसरले

मुंबई : नागपूर शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण एम्सच्या टेम्पल ग्राऊंडवर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी केलेलं भाषण हे पंतप्रधान म्हणून केलेलं नव्हतं तर एखाद्या पक्षाच्या नेत्याप्रमाणे त्यांनी भाषण केलं. देशातील सगळ्या प्रांतांकडे बघताना आपण देशाचं नेतृत्व करतोय, याचं स्मरण ठेवलं पाहिजे असं म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला तर वादग्रस्त वक्तव्य करुन वरती कापड गिरणी कामगाराचा मुलगा सांगणं हा चंद्रकांत पाटील यांचा कांगावा आहे, अशी टीका पवारांनी केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस… पवार आज ८३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीकडून खास कार्यक्रमांच आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार, खासदार तसेच सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शरद पवार यांनी संबोधित केलं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी गेल्या काही दिवसांच्या घडामोडींच्या अनुषंगाने विरोधी पक्षावर जोरदार टीका केली.

मोदींचं भाषण एखाद्या पक्षाच्या नेत्यासारखं…!!

राज्यकर्त्यांनी संबंध देशाच्या प्रांतांकडे पाहताना आपण देशाचे नेतृत्व करतो, याचं स्मरण ठेवलं पाहिजे. कालचं नागपूर मेट्रो उद्घाटन आणि समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पाहिला असता नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं तर ते पंतप्रधानांचं वाटत नाही. ते एखाद्या पक्षनेत्यासारखं वाटतं… त्यांनी भाषणामध्ये मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षावर टीका केली. खरं तर एखाद्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पंतप्रधानांनी अशी टीका वगैरे टाळायला हवी… मोदींना ती टाळता आली असती… असं पवार म्हणाले

चंद्रकांत पाटलांचा कांगावा सुरु

गिरणी कामगाराचा मुलगा मंत्रिपदापर्यंत पोहोचला हे काही जणांना बघवत नाही, म्हणून माझ्यावर शाईफेकीसारखा प्रकार झाला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाचा शरद पवार यांनी जोरदार समाचार घेतला. महाराष्ट्रात छोट्या घरातून आलेली किती मुलं सत्तेची उच्चपदस्थ खुर्चीवर जाऊन बसली… अशी कैक उदाहरणे देता येतील. चंद्रकांत पाटलांचा हा सगळा कांगावा सुरु आहे, अशी टीका पवार यांनी केली.

Source link

chandrakant patilPM ModiSharad Pawarsharad pawar birthdayचंद्रकांत पाटीलनरेंद्र मोदीशरद पवारशरद पवार वाढदिवस
Comments (0)
Add Comment