धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखरण येथील गट नंबर २२७ येथे औष्णिक विद्युत प्रकल्प अंतर्गत शेतजमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. ही जमीन औष्णिक विद्युत प्रकल्पातून वर्ग करून सोलर प्रकल्पात वर्ग करण्यात आली. त्यावेळी संबंधित शेतकऱ्यांच्या मुलांना आणि त्यांच्या वारसांना औष्णिक विद्युत प्रकल्पात नोकरी लावून देण्याचे आमिष देण्यात आले होते. ही नोकरी मिळण्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.
मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या वारसांना नोकरी देण्यात आलेली नाही. उलट औष्णिक विद्युत प्रकल्प हा सोलर प्रकल्पात वर्ग करण्यात आल्याने शेतकऱ्यांची आणि त्यांच्या वारसांची फसवणूक झाल्याचा आरोप करत येथील शेतकऱ्यांकडून प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र, तरीही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली न गेल्याने आज जयसिंग सरदार सिंग गिरासे या ६७ वर्षीय शेतकऱ्याने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने जयसिंग गिरासे या शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी इतर शेतकऱ्यांनी देखील जयसिंग गिरासे यांच्यासह धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. शासनाने आमची फसवणूक केली असून आमच्या वारसांना नोकरी देण्यात आलेली नाही. तसेच अद्यापपर्यंत या जमिनीचा एकही मोबदला मिळालेला नाही. यामुळे प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा यावेळी शेतकऱ्यांनी घेतला.
प्रसिद्ध कव्वाली गात गुलाबराव पाटलांनी लक्ष वेधलं, उपस्थितांची मनं जिंकत दाद मिळवली