वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणून या उद्यानाचा उल्लेख मुंबईच्या विकास आराखडा २०३४ मध्ये झाला आहे. नुकत्याच सप्टेंबरमध्ये राज्य सरकारने याबाबतचे नोटिफिकेशन जारी केल्याची माहिती सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाऊंडेशनच्या कार्यकर्त्या शुभदा निखार्गे यांनी दिली.
वीरमाता जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाची स्थापना १८६१ मध्ये अॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेने व्हिक्टोरिया गार्डन्स या नावाने एक वनस्पती उद्यान म्हणून केली. तत्कालीन ब्रिटीश राजवटीचा हा पहिलाच सार्वजनिक प्रकल्प होता. १८९० साली या उद्यानात प्राणिसंग्रहालयाची भर घालण्यात आल्याने हे उद्यान अतिशय लोकप्रिय झाले. १९६९ मध्ये उद्यानाचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान असे झाले, तर १९८० मध्ये वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय असे ठेवण्यात आले.
या उद्यानात ६४ अंतर्गत बागांचा समावेश आहे, तर २५६ प्रजातींचे ४ हजार १३१ वृक्ष आहेत. त्यामधील अनेक वृक्षांचे आयुष्यमान हे १०० हून अधिक आहे. या वनस्पती उद्यानात मोठ्या प्रमाणात छोटे सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक अशा सजीवांनाही निवारा मिळाला आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे मुंबईतील एकमेव असे वारसा दर्जा प्राप्त वनस्पती उद्यान आहे. १९ व्या शतकात युरोपमधील अनेक उद्यानांमध्ये लोकप्रिय असलेल्या अभिजात पुरूज्जीवन शैलीमध्ये या उद्यानाची रचना आहे.