शिंदेंना बोम्मईंना फोन करायला सांगितलं, फडणवीसांना ‘मेसेज’ दिला, अजितदादांनी प्रसंग सांगितला!

नागपूर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगाव येथील महामेळाव्याला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडीच्या कोल्हापुरातील नेते-पदाधिकाऱ्यांची कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांशी झटापट झाली. या नेते व पदाधिकाऱ्यांना कर्नाटकात प्रवेश करण्यास मज्जाव करत पोलिसांनी लाठीमार केला आणि ताब्यातही घेतले. या प्रसंगानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं दालन गाठलं. झाला प्रकार बरोबर नसून तुम्ही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन लावा, अशी अजितदादांनी विनंती केली. त्यांचा संपर्क झाला नसल्याने दादांनी फडणवीसांना फोन लावून बोम्मईंना विनंती करण्याची सूचना केली.

कर्नाटक सरकारकडून सीमावासीयांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी बेळगाव येथे महामेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात सामील होण्यासाठी व सीमाबांधवांना पाठिंबा दर्शविण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते बेळगावकडे निघाले होते. यामध्ये आमदार हसन मुश्रीफ, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी महापौर आर‌. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुनील मोदी सहभागी झाले होते. कोगनोळी नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी बॅरेकेट लाऊन नाकाबंदी केली होती. या ठिकाणी एक हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त होता. पोलिसांचे कडे झुगारून कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी मागे रेटले. कडे तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांवर लाठीमार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. झाल्या प्रकारानंतर अजित पवार यांनी थेट एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाप्रश्नी काल विधिमंडळात चर्चा झाली. विरोधी पक्षाची भूमिका मी काल सभागृहात मांडली. शिंदे-फडणवीसांना बोम्मईंना फोन करायला सांगून ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडायला सांगितलं. गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर जी चर्चा झालीये, त्याप्रमाणे सीमेवर परिस्थिती नाहीये, त्याची बोम्मईंना कल्पना द्या, अशी सूचना अजित पवार यांनी केली. आज त्यांनी याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांना बोलताना दिली.

मविआची कालची बैठक कॅन्सल

सोमवारी महाविकास आघाडीची बैठक आयोजित केलेली होती. परंतु अधिवेशनाचं कामकाज एवढ्या लवकर संपेल, याचा आम्हाला अंदाज नव्हता. तसेच उद्धव ठाकरे यांचंही नागपुरात उशिरा आगमन झाल्याने बैठक होऊ शकली नाही. ती बैठक आज सकाळी संपन्न झाली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Source link

ajit pawarbasavraj bommaiCM Eknath Shindedevendra fadanvismaharashtra karnataka border issueअजित पवारदेवेंद्र फडणवीसबसवराज बोम्मईमहाराष्ट्र कर्नाटक सीमावाद
Comments (0)
Add Comment