श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लक्ष लागून होते. अपेक्षप्रमाणे तो धक्कादायक लागला. तेथे सरपंच पदासाठी आमदार पाचपुते यांचे चिरंजीव प्रताप आणि पुतण्या साजन यांच्यात लढत झाली. १६१ मतांनी साजन पाचपुते विजयी झाले आणि प्रताप यांना एका अर्थाने स्वत: आमदार पाचपुते यांना पभराभवाचा धक्का बसला. १० सदस्य पाचपुते यांचे तर ७ सदस्य साजन यांचे निवडून आले असले तरी थेट निवडणूक असल्याने सरपंच पद साजन यांच्याकडेच गेले आहे.
आमदार पाचपुते यांचे बंधू भाजपचे ज्येष्ठ नेते सदाशिव पाचपुते यांचे मागील वर्षी निधन झाले. ते जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच साईकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष होते. तालुक्यातील निवडणूक यंत्रणेतील खाचाखोचा त्यांना माहिती होत्या. पाचपुते यांच्या विजयाचे तेच खरे शिल्पकार मानले जात. राजकारणच नव्हे तर साखर कारखाने आणि अन्य व्यवयासही त्यांनी सांभाळले. त्यांच्यावर स्वत: पाचपुते यांचाही विश्वास होता.
त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव साजन यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू झाली. ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात येतील, असा अंदाज होता. मात्र, काही कारणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबल्या. मध्येच ग्रामपंचायतीची निवडणूक आली. साजन यांनी आपल्या गावातच म्हणजे काष्टीतूनच खुद्द पाचपुते यांनाच आव्हान दिले. हे बंड मिटेल, तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. मुलगा आणि पुतण्या यांच्यातील लढत पाहण्याची वेळ पाचपुते यांच्यावर आली. एककाळ असा होता की स्वत:च्या निवडणुकीसाठीही ते भावावर विसंबून राहत. आता मात्र त्यांना मुलासाठी पुतण्याच्या विरोधातच उतरावे लागले. त्यातही पराभवाची नामुष्की आली.
मधल्या काळात पाचपुते आजारी होते. त्यात भावाचे निधन झाले. मात्र, आपल्या वडिलांच्या अकस्मात जाण्याने कारखान्याची जबाबदारी खांद्यावर घेत साजन व सुदर्शन या बंधूंनी शेतकऱ्यांचा आणि मतदारांचा विश्वास संपादन केला. तेथूनच त्यांची राजकीय मोर्चे बांधणी सुरू झाली. साजन यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लोकांना जोडण्याचे काम सुरू केले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी संपर्क ठेवला. इतर पक्षांतही मित्र जमविले. त्यांचे हे सर्व जिल्हा परिषदेसाठी सुरू असावे, असे सुरवातीला वाटत होते. आपण आमदार पाचपुते यांच्या कुटुंबासोबतच आहोत, त्यांच्यापासून वेगळे होणार नाही, असेही साजन सांगत होते. मात्र, मोठी निवडणूक दूरच…. गावच्या निवडणुकीतच दोघांत बिनसले आणि पाचपुते यांचा पाचपुतेच पराभव करू शकतात, हा संदेशही गेला. आता हे मतभेद फक्त गावच्या निवडणुकीपुरतेच राहतात की मोठ्या निवडणुकांतही कायम राहतात, यावर पुढील गणित अवलंबून आहे.