नरवाडच्या शिंदे घराण्यातील यशोधरा हिला लहानपणापासून राजकारणाचे धडे घरातच मिळाले होते. पणजोबा नरवाड गावचे २५ वर्ष सरपंच, त्यानंतर त्यांच्या आजी मंदाकिनी राजे शिंदे गावच्या ५ वर्षे सरपंच होत्या. तसंच वडील महेंद्रसिंग राजे शिंदे यांनी देखील ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे यशोधरा हिला राजकीय वारसा होता.
वड्डी गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्यानंतर सर्वसाधारण खुल्या गटामध्ये सरपंचपदी कुणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न पॅनल उभे करताना शिंदे कुटुंबियांसमोर निर्माण झाला होता. यातून यशोधराराजे शिंदे हिचे नाव समोर आले. यशोधरा ही त्यावेळी जॉर्जिया याठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत होती. कुटुंबातील लोकांनी मग यशोधरा हिला सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं, असं सांगितलं. सुरुवातीला तिला देखील ही गोष्ट काहीशी अवघड वाटली. मात्र घरच्यांचा आणि ग्रामस्थांचा असणारा आग्रह यामुळे यशोधरा राजे हिने सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निश्चय करत आपल्या शेवटच्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण सोडून या निवडणुकीसाठी ती गावी परतली.
रेणुका देवी ग्रामविकास सरकार पॅनलच्या माध्यमातून गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी यशोधरा राजे हिने अर्ज दाखल करत निवडणुकीच्या प्रचार धडाक्यात सुरू केला आणि या निवडणुकीत ती विजय देखील झाली. तिने गावातील सत्तारूढ शिवस्वराज्य ग्राम विकास पॅनलच्या झाकीर वजीर यांचा १४९ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत यशोधरा राजे हिला १३८४ तर झाकीर हुसेन यांना १२३३ मते मिळाली.
दरम्यान, या विजयानंतर बोलताना यशोधरा राजे शिंदे हिने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, ‘लोकांनी माझ्यासह आपल्या पॅनलवर देखील विश्वास ठेवला आहे आणि हा विश्वास सार्थ करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार आहोत. गावातल्या लहान मुलांच्या शाळा, आरोग्य, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे महिला सक्षमीकरण अशा गोष्टींना प्राध्यान देणार असून परदेशात आपण ज्या गोष्टी पाहिल्यात त्या गावपातळीवरही राबवून गावाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपल्यासमोर एकमेव ध्येय आहेत. गावामध्ये छोटे-मोठे उद्योग उभारण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे,’ असं या विजयानंतर यशोधरा राजे शिंदे हिने स्पष्ट केलं आहे.